राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. राजकीय वर्तुळात या निर्णयामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून भाजपाकडून या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची वाईन उद्योगात पार्टनरशिप असल्यामुळेच त्यांना विशेष वाईनप्रेम असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“जेव्हा गांजाचा विषय निघाला, तेव्हा शरद पवारांपासून नवाब मलिक हर्बल गांजा म्हणत होते. आताही उद्धव ठाकरे, संजय राऊत वाईन म्हणजे दारू नव्हे असं म्हणत आहेत. मग वाईन म्हणजे काय आहे संजय राऊत? किरीट सोमय्या आणि वाईनचा दमडीचा संबंध नाही. मी आयुष्यात कधी अंडंही खाल्लं नाही, बिडी ओढली नाही, सिगरेट ओढली नाही, वाईन नाही आणि बिअरही नाही”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
दरम्यान, संजय राऊत यांच्या कुटुंबीयीची वाईन उद्योगात पार्टनरशिप असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. “संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातल्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसायात भागिदारी सुरू केली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कारनामे फक्त पैसे गोळा करणे हे आहेत. तुम्ही महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवायला निघाले आहात का? संजय राऊतांनी सांगावं, किती महिन्यांपूर्वी तुम्ही मॅगपी ग्रुपचे अशोक गर्ग यांच्यासोबत बिझनेस पार्टनरशिप केली. त्यांच्या परिवारात त्यांच्या कन्या, त्यांची पत्नी किती व्यवसायांमध्ये अधिकृत पार्टनर आहेत?”, असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला.
“अशोक गर्ग हे २००६ पासून मॅगपी ग्रुप चालवतात. २०१०मध्ये त्यांनी अजून एक कंपनी सुरू केली. या दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय हॉटेल, पब येथे वाईन वितरीत करणं हा आहे. अशोक गर्ग यांची महाराष्ट्रात मोनोपोली आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अधिकांश वाईन याच ग्रुपची जाते. १०० कोटींची वार्षिक उलाढाल या ग्रुपची आहे. अशोक गर्ग यांच्या व्यवसायात कुणाचीही पार्टनरशिप नव्हती. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या ग्रुपसोबत करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता, उर्वशी मॅगपी कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या”, असा दावा देखील किरीट सोमय्या यांनी केला. यावेळी किरीट सोमय्या यांनी संबंधित कागदपत्र देखील माध्यमांसमोर दाखवली.