ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली भागात रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे तसेच दोन अवजड वाहने बंद पडल्याने शनिवारी माजीवडा ते रांजनोली नाक्यापर्यंत दोन्ही मार्गावर सुमारे पाच तास वाहतूक कोंडी झाली होती. १५ ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना एक तास लागत होता.
सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही वाहतूक कोंडी काहीशी सुटली होती. शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मानकोली येथे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. त्याचवेळी मानकोली परिसरात दोन अवजड वाहने बंद पडली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. माजीवडा ते रांजनोली नाक्यापर्यंतचे १० ते १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे एक तास लागत होता. पोलिसांनी बंद पडलेली अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला केली. परंतु दुपारी उरण जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहनांचाही भार या मार्गावर होता. त्यामुळे कोंडीत भर पडली.