मुंबई - या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आशेचा पार चुराडा झाला आहे. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात फक्त आकड्यांचा खेळ... भरमसाठ घोषणा मांडल्या... पण ठोस काहीच दिले नाही. एखाद्या पक्षाच्या जाहीरनाम्याप्रमाणे अर्थसंकल्प मांडला गेला. म्हणूनच हा निवडणूक संकल्प असल्याची खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.कोरोना, लॉकडाऊन, बेरोजगारी, महागाई अशा विविध कारणांमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशातील सामान्य माणूस पिचला गेला आहे. मायबाप सरकारकडून थोड्याबहोत प्रमाणात दिलासा मिळावा अशी आशा नागरिकांना होती. नागरिकांना या येणाऱ्या अर्थसंकल्पातून आशेचा किरण दिसत होता मात्र हा आशेचा किरण दिसलाच नाही असेही जयंत पाटील म्हणाले.अर्थसंकल्पातून आपल्याला करात दिलासा मिळावा, पेट्रोल-डिझेलचे दर कमी व्हावे, रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचे भाव कमी व्हावे अशी किमान अपेक्षा सामान्य नोकरदारवर्गाची होती मात्र याबाबतीत अर्थसंकल्पात उल्लेख न करता निवडणूक प्रचाराच्या भाषणाप्रमाणे घोषणांचा पाऊस अर्थसंकल्पातून पाडला असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला.कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर करण्यात आला आणि कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्के करण्यात आला आहे. सामान्य माणसाचा विचार न करता कॉर्पोरेटचा विचार सरकारने केलेला दिसत असून या तरतुदीच्या माध्यमातून सुटबुटवाल्या सरकारने मध्यमवर्गीयांच्या पदरी निराशा टाकली आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.