नाशिक : मागील महापालिका निवडणुकीत घाऊक प्रमाणात पक्षांतर झाले होते. मनसेसह अन्य पक्षांतून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी होती. या वेळी शिवसेनेत अनेक नगरसेवक येणार असल्याचे दावे होत असले तरी नव्या प्रभाग रचनेमुळे अशा प्रकारांना चाप लागल्याचे अधोरेखित होत आहे. बहुतांश नगरसेवकांचे बालेकिल्ले शाबूत राहिले. त्यामुळे पक्षांतराची जोखीम फारशी कुणी पत्करण्याची शक्यता नाही. आकाराने मोठे प्रभाग प्रबळ राजकीय पक्षांना लाभदायी ठरतात. पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने किंवा अन्य कारणास्तव अपक्ष म्हणून मैदानात उतरणाऱ्यांसमोर विस्तृत क्षेत्रफळात प्रचाराचे आव्हान राहणार आहे. महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. हरकती आणि सुनावणीची प्रक्रिया पार पडून महिनाभरात अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.
या स्थितीत प्रत्येक राजकीय पक्ष आणि नगरसेवकांकडून आपापल्या नव्या प्रभागाच्या हद्दी तसेच क्षेत्रावर अभ्यास सुरू झाला आहे. बहुतेक नगरसेवकांचे बालेकिल्ले शाबूत राहिल्याने कुणाकडून पक्षांतराचा विचार होईल, यावर राजकीय पातळीवर मतभेद आहेत. गेल्या वेळी राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे सर्व पक्षांतून त्या पक्षात घाऊक प्रमाणात स्थलांतर झाले. काही तत्कालीन नगरसेवकांनी प्रभागातील समीकरणे लक्षात घेऊन शिवसेनेचा मार्ग स्वीकारला. तथापि, त्यातील अनेक जण पराभूत झाले. भाजपमध्ये गेलेल्या अनेकांच्या भाळी विजयाचा टिळा लागला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत अनेक नगरसेवक शिवसेनेत येणार असल्याचे मध्यंतरी खा. संजय राऊत यांनी म्हटले होते. तथापि, नव्या प्रभाग रचनेनंतर तशी शक्यता धूसर झाल्याचे चित्र आहे.
प्रभाग रचनेत बहुतेक नगरसेवकांचा हक्काचा भाग कायम राहिला. पक्षांतराच्या मानसिकेत असणारे सावध झाले आहेत. त्यांच्याकडून तसे पाऊल उचलले जाण्याची शक्यता मावळली आहे. नव्या रचनेमुळे पक्षांतराचे प्रमाण अगदीच तुरळक असेल असे भाकीत वर्तविले जात आहे. या प्रभाग रचनेचा अपक्षांना फटका बसणार आहे. चारसदस्यीय प्रभाग रचनेत संपूर्ण शहरातून मागील निवडणुकीत तीन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. नवे प्रभाग तीनसदस्यीय असले तरी क्षेत्रफळ विस्तृत आहे. अपक्षांना मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे. याबाबत महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी प्रभाग रचना ही प्रक्रिया असून जी व्यक्ती काम करते, त्याच्या पाठीशी मतदार उभे राहतात, याकडे लक्ष वेधले. नगरसेवकपदाची निवडणूक उमेदवाराचा व्यक्तिगत संपर्क किती यावर अवलंबून असते. काम करणारी व्यक्ती शहर आणि परिसर म्हणून काम करते. त्यामुळे प्रभाग रचनेतील बदलाचा त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या प्रभाग रचनेमुळे भाजपचे कुणी विद्यमान नगरसेवक पक्षांतर करणार नाहीत. उलट अन्य पक्षांतून भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. मागील निवडणुकीत भाजपमध्ये दाखल झालेले अनेक जण पक्षात स्थिरावले. त्यामुळे एक टक्क्यापेक्षा कमी लोक पक्षातून बाहेर पडले. विस्तृत क्षेत्रफळाचे प्रभाग भाजपला लाभदायी ठरतात. लहान प्रभागात दडपशाही होण्याची शक्यता असते. मोठय़ा प्रभागात तसे घडत नाही. लोकशाही पद्धतीने ही प्रक्रिया पार पडते. पक्षाची सर्व प्रभागांत यंत्रणा असून त्याचा उमेदवारांना लाभ होईल. आयारामांमुळे कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही.
– गिरीश पालवे (महानगराध्यक्ष, भाजप)
ज्या प्रभागात पक्षाकडे उमेदवार नाही, तिथे अन्य पक्षांतील नगरसेवकांचे स्वागत केले जाईल. निवडणूक जिंकण्याची क्षमता याचा प्राधान्याने विचार केला जाईल. जिथे पक्षाचे सक्षम उमेदवार आणि पदाधिकारी आहेत, त्यांना न्याय दिला जाणार आहे. गतवेळी विविध पक्षांतून तत्कालीन २२ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यातील केवळ दोघे निवडून आले. २० जागांवर पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे आयारामांवर फारसे लक्ष न देता प्रत्येक प्रभागात निवडणूक जिंकण्यावर भर दिला जाणार आहे. सेनेत येणाऱ्यांचे स्वागत केले जाईल.
– सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुख, शिवसेना)