मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) यांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन (attack on Kirit Somaiyya) सनसनाटी आरोप केलाय. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलंय. मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची हत्या करायचा कट होता, असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मॉब लिचिंगचा कट रचल्याचा गंभीर आरोप या पत्राद्वारे केला गेल्यानं नव्या वादाता तोंड फुटण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा एक जाणीवपूर्वक रचलेला कट होता, असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याप्रकरणी आता केंद्रानं (Centre Government) जातीनं लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या हल्ल्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी सात मुद्दे उपस्थित केले आहेत. भ्रष्टाचाराविरोधात वेगवेगळे घोटाळे बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवरच त्यांनी सवाल उपस्थित केलेत. याप्रकरणी आता NIA चौकशी करुन हल्ल्याप्रकरणातील दोषींवर कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
किरीट सोमय्यांना संरक्षण द्यायचं सोडून पोलिसही सरकारच्या कट कारस्थानात सामील असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी कमकुवत कलमं लावत मुद्दामूद हल्लेखोरांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले असल्याची टीका केली आहे.
पोलिसांनी किरीट सोमय्यांवर हल्ला होत असताना बघ्याची भूमिका घेतल्याचाही आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी वेळीच हल्लेखोरांना रोखलं का नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याप्रकरणी पोलिसही सामील असल्यामुळे अशा पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सोमय्यांवरील हल्ल्याचा कट रचणाऱ्या महाराष्ट्र सरकारवरही कारवाई केली जावी, असंही चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटलंय.
1. पुणे पोलिसांनी सोमय्या यांच्या संरक्षणासाठी पर्यायी पुरेसा पोलिस बंदोबस्त का दिला नाही?
2. संविधानानं दिलेल्या अधिकारांवर करण्यात आलेला हा हल्ला असून याआधीही सोमय्यांची अशीच गळचेपी करण्यात आली आहे. कोल्हापुरातही त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला होता.
3. पुण्यातील या हल्ल्याबाबत शिवसेनेनं शिवसैनिकांबाबत घेतलेल्या भूमिकेतून हे स्पष्ट होतं, की हा एक नियोजित हल्ला होता.
4. सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत असून केंद्रानं याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) परिसरात असताना सोमय्या यांना काही शिवसैनिकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच त्यांना धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. महत्वाची बाब म्हणजे शिवसैनिकांनी अंगावर धावून येण्याचा प्रयत्न करताच सुरक्षा रक्षक सोमय्यांना तिथून घेऊन निघाले. त्या गोंधळात सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळ्याचं एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं. त्यामुळे सोमय्या यांना दुखापत झाली. नंतर त्यांना उपचारासाठी संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये काही शिवसैनिक सोमय्या यांच्या अंगावर धावून जाताना दिसले. काहीजण गाडीसमोर आडवे पडून सोमय्या यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न करतानाही दिसून आले. तर एक व्यक्ती सोमय्या यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत असताना दिसली होती. महत्वाची बाब म्हणजे एक महिला सोमय्या यांच्या गाडीवर चप्पल फेकत असल्याचंही एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं होतं.