कोल्हापूरः महाराष्ट्राच्या (Maharashtra) वैभवशाली चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णकाळाची नोंद करणाऱ्या कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओची (Jayaprabha Studio) ऐन कोरोनाकाळात सारे जग ठप्प असताना विक्री झाल्याचे समोर आले आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी 6 कोटी 50 लाखांमध्ये या जमिनीचे अक्षरशः तुकडे पाडण्यात आले. विशेष म्हणजे हा सारा व्यवहार होताना समग्र कोल्हापूरकर अंधारात होते. लतादीदी (Latadidi) निवर्तल्यानंतर त्यांचे स्मारक कुठे व्हावे, याची चर्चा सुरू झालीय. मात्र, तत्पूर्वीच श्री महालक्ष्मी स्टुडिओतर्फे सचिन श्रीकांत राऊत यांनी हा स्टुडिओच विकत घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या जागेचा कोल्हापूर महापालिका आणि राज्य सरकारने वारस्थळात समावेश केला होता. तरीही हा व्यवहार झाला. त्यामागे कोणाचे आशीर्वाद होते, अशी चर्चा आता रंगली आहे.
जयप्रभाचा इतिहास
जयप्रभा स्टुडिओ ही छत्रपती राजाराम महाराज आणि भालजी पेंढारकर यांची आठवण आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी 1 ऑक्टोबर 1933 मध्ये कोल्हापूर सिनेटोन स्थापन केले. चित्रपटसृष्टीला हक्काचे साधन, कोल्हापूरचा विकास हा त्यामागचा उद्देश होता. या कामाची धुरा राजाराम महाराजांनी मेजर दादासाहेब निंबाळकर यांच्याकडे दिली. त्यांनी स्टुटिओचा कारभार भालजी पेंढारकरांकडे दिला. 13 एकर जागेवर हा स्टुडिओ उभारण्यात आला होता.
लतादीदींकडे कसा आला?
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी या स्टुडिओची जाळपोळ केली. मात्र, पुन्हा हा स्टुडिओ उभारणे भालजींना जमले नाही. त्यामुळे त्यांनी 1959 साली 60 हजारात जयप्रभा स्टुडिओ लतादीदींना विकला. मात्र, लतादीदींना ही हा खर्च झेपेना त्यांनी स्टुडिओची पाऊण एकर जागा ठेवून उर्वरित जागा विक्रीला काढली. त्याला विरोध झाला. महापालिका आणि राज्य सरकारने ही जागा वारसास्थळ म्हणून घोषित केली. त्याविरोधात लतादीदी सुप्रीम कोर्टात गेल्या. मात्र, त्यांनी पुन्हा याचिका मागे घेतली. त्यांनी स्टुडिओ आहे तसा ठेवून उर्वरित जागा विकसित करण्याची परवानगी मागितली होती. आता तर स्टुडिओच परस्पर विकल्याचे समोर आले आहे.
कोणी घेतली जागा?
श्री महालक्ष्मी स्टुडिओजतर्फे ही जागा सचिन श्रीकांत राऊत, महेश अमृतलाल बाफना-ओसवाल, सय्यम नरेंद्रकुमार शहा, हितेश छगनलाल ओसवाल, पोपटलाल खेमचंद शहा-संघवी, राजू रोकडे, रौनक पोपटलाल शहा-संघवी, ऋतुराज राजेश क्षीरसागर, पुष्कराज राजेश क्षीरसागर, आदीनाथ शेट्टी यांना विकल्याचे समोर आले आहे. यापूर्वी जयप्रभा स्टुडिओज ठेवून आवारातील मोकळी जागा विकण्यात आली होती. मात्र, आता हेरिटेज इमारतीसह सर्व स्टुडिओ विकल्याचे समोर आले आहे.
कसे रचले कारस्थान?
जयप्रभा स्टुडिओ विकण्याचे पद्धतशीर प्लॅनिंग करण्यात आले. त्यासाठी महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या संस्थेची नोंदणी केली. 3 ऑक्टोबर 2019 रोजी हे काम अतिशय गुप्तपणे पार पडले. त्यानंतर स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले आहे. या साऱ्या व्यवहरात कोल्हापूरमधील अनेक बडे नेते सहभागी असल्याचे समजते. ते नेते कोण, याची चर्चा सुरू आहे. जयप्रभा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी उभारलेला लढा महाराष्ट्राने पाहिला. आता कोल्हापूरकर पुन्हा आक्रमक होतात का, हे पाहावे लागेल.