मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने भाजप कार्यालयाबाहेर आंदोलनाचा सपाटा सुरू केला आहे. आज काँग्रेसने (Congress) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे सागर निवासस्थानाकडे जात असतानाच पोलिसांनी पटोले यांना अडवलं आहे. तुम्हाला आंदोलन करता येणार नाही. आझाद मैदानात जा, असं पोलिसांनी पटोले यांना सांगितलं. तर, आम्हाला फक्त मेसेज द्यायचा आहे. आम्ही आहे तिथून आंदोलन करू. आझाद मैदानात जाणार नाही, असं नाना पटोले यांनी पोलिसांना निक्षून सांगितलं आहे. तसेच पटोलेंनी वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी नाना पटोले हे त्यांच्या निवासस्थानातून निघाले होते. त्यांच्यासोबत शेकडो वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते टाळमृदुंग वाजवत होते. पटोले हे पायीच सागर निवासस्थानाकडे निघाले होते. तितक्यात पोलिसांनी त्यांना अडवलं आणि सागर निवासस्थानाकडे जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी नाना पटोले आणि पोलिसांत काही संवाद झाला.
पोलीस: नमस्कार. तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला पुढे जाता येणार नाही. एवढ्या जनसमुदायासह तुम्हाला आंदोलन करायला जाता येणार नाही.नाना पटोले: गाड्याने जाता येईल. आमच्या गाड्यांनी नाही तर तुमच्या गाड्यांनी जातो.पोलीस: हे आंदोलन योग्य नाही. तुम्ही आझाद मैदानात जा. तिथे आंदोलन करा.कार्यकर्ते: आमचं शांततेच्या मार्गाने आंदोलन आहे. आम्ही गांधीवादी विचाराचे आहोत.पोलीस: पोलीस दलामार्फत तुम्हाला विनंती आहे की आंदोलन करू नका.नाना पटोले: आमचे लोकं तिथे आहेत, त्यांना घेऊन येतो.कार्यकर्ते: तुमच्या गाडीतून येतो.पोलीस: आपण आझाद मैदानाला जाऊ या.कार्यकर्ते: आझाद मैदानात जाऊन काय करू आम्ही?पोलीस: आझाद मैदान ही आंदोलनाची जागा आहे.नाना पटोले: आम्हाला प्रोटेस्ट इथेही करता येतो. आम्हाला मेसेज द्यायचा आहे. त्यामुळे आंदोलन इथे करायचं आहे. काँग्रेसच्या हाकेला लोक आवाज देत आहेत. शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अवमान केला जात आहे. त्यामुळे आंदोलन करणारच. जिथे आहोत तिथूनच आंदोलन करणार. कार्यकर्ते येत आहेत. ते आल्यावर आंदोनल कुठे करायचं ते ठरवू. पण पोलिसांना सहकार्य करणार आहोत.
त्यानंतर पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामुळे कोरोना पसरल्याचे विधान संसदेत केले. आता भाजपचे नेते या चुकीच्या वक्तव्याचे समर्थन करत आहेत. त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाय. आम्ही फक्त मोदींनी माफी मागावी इतकेच म्हणतोय. दुसरीकडे प्रसाद लाडांसारखे अण्णा हजारांच्या वक्तव्याचा आधार घेत आहेत. मात्र, आम्ही अण्णा हजारेंवर काहीच बोलायचं नाही, असं ठरवल्याचे ते म्हणाले.