मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) एका प्रकरणाचा तपास सुरु असताना मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणातच आज मलिक यांना अटक करण्यात आली आहे. या नंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजल्याचं पाहायला मिळतंय. सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी ‘नवाब बेनकाब हो गया’ असा जोरदार टोला लगावलाय.
‘नवाब बेनकाब हो गया! गुन्हेगार समर्थक ठाकरे सरकार का पर्दाफाश हो गया!’, असं ट्वीट करत आशिष शेलार यांनी मलिकांवर निशाणा साधलाय. इतकंच नाही तर ‘आरोपी आणि संशयित लोकांच्या वतीने उत्तर देता येत नाहीत, त्यावेळी काही राजकीय पक्ष विशेषत: महाविकास आघाडीतील सत्ताधारी, तपास यंत्रणांच्या कारवाई आड लपून भाजपा हल्ला करतात, अशा हल्ल्याला आम्ही घाबरत नाही’, असंही शेलार यांनी म्हटलंय.
‘संजय राऊत आमच्या मुंबईवरती झालेला ब्लास्ट सत्तेसाठी मुजरे करण्यात विसरलेला दिसतायेत. ज्यात 257 मुंबईकरांनी प्राण गमावले, ज्यात दाऊद शामिल होता. त्या देशद्रोह्यांबरोबर भागिदारीचा आरोप मलिकांवर आहे. याचा सखोल तपास झाला पाहिजे ही मागणी न करता त्यांचा ते बचाव करताय’, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केलीय.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लागावलाय. कर नाही त्याला डर कशाला? तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला ईडीच्या नोटीसची भीती का आहे? जर काही केलच नसल तर चौकशीतून काहीच सिद्ध होणार नाही मग भीती कसली? कशासाठी एवढा आरडाओरडा करता? असा सवाल पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर ‘माकडीणीच्या नाकातोंडाशी पाणी आलं की ती आपल्या पिल्लाला पायाशी धरते, हीच संस्कृती मविआ सरकारच्या नेत्यांची आहे. छगन भुजबळ 2 वर्षे तुरुंगात असताना त्यांना कुणी भेटायला गेलं नाही, आता अनिल देशमुखांच्या बाबतीतही तेच घडतंय. ‘मी तोंड उघडलं तर महागार पडेल’ असं परवा स्वत: देशमुख म्हणाले आहेत आणि ते एक दिवस नक्की तोंड उघडतील!’ अशी खोचक टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केलीय.