मुंबईः मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचे अस्त्र पुकारणारे छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje Chatrapati) यांची आज तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिलाय. मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झालीय. या बैठकीसाठी राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) या बैठकीत आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, राजेंनी आता निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे डॉक्टरांसह सारेच चिंतेत आहेत.
मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या राजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. डॉक्टर दिवसातून तीन वेळेस त्यांची तपासणी करत आहेत. सकाळी तपासणी केल्यानंतरही डॉक्टरांना राजेंच्या रक्तातील साखर कमी झाल्याची आढळली. त्यांनी राजे यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, राजेंनी त्यालाही नकार दिला. आत्ता थोड्या वेळापूर्वी पुन्हा एकदा आझाद मैदानावर रुग्णवाहिका दाखल झालीय.
डॉक्टर म्हणतात…
डॉक्टरांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या साखरेची पातळी तपासली. रक्तदाब तपासला. तेव्हा राजे यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, राजे सध्या उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. तो सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजे यांच्या ट्वीटर हँडलवरूनही तसे ट्वीट करण्यात आले आहे.