मुंबईः पुढील काही दिवस मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑफलाइन पद्धतीने (Offline Schools) घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारपासून विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येणार नाही, असा निर्णय अनेक स्टेट बोर्डाच्या शाळांनी घेतला आहे. कारण येत्या मंगळवारपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. बहुतांश शाळांमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचे केंद्र देण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांची सोय व्हावी, याकरिता इतर इयत्तांच्या वर्गांची शिकवणी ऑनलाइन पद्धतीने (Online Schools) घेतली जाणार आहे. 15 मार्च ते 04 एप्रिल या कालावधीत दहावीच्या परीक्षांचे (SSC Board Exams) नियोजन आहे. त्यामुळे या काळात इतर वर्ग ऑनलाइन भरवण्यात येतील आणि दहावीची परीक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येईल, असा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे.
कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णांचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यात आल्या. मार्च महिन्यात मुंबईतील शाळा 100 टक्के ऑफलाइन पद्धतीने सुरु होत्या. यावेळी विद्यार्थ्यांची 80 ते 90 टक्के उपस्थिती दिसून आली. अनेक शाळांमधील या शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम संपला असून विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी सुरु आहे.
दरम्यान, येत्या 15 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरु होणार असून विद्यार्थ्यांना नियोजित परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी अनेक शाळांनी 04 एप्रिलपर्यंत इतर वर्ग ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असे सांगितले आहे. तसेच शहरात मार्च महिन्यात ऑफलाइन शाळा असली तरीही अनेक शाळांनी व्हर्चुअल शिकवणी सुरुच ठेवली होती. या शैक्षणिक वर्षात तरी अशा प्रकारची हायब्रिड शिक्षण पद्धती सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं भायखळा येथील शाळेच्या प्राचार्यांनी सांगितलं. दहावीच्या परीक्षेची वेळ 10.30 ते 2.00 अशी आहे. तसेच ज्या दिवशी दहावीचे पेपर नसतील, त्या दिवशी शाळा सुरु ठेवण्याचा निर्णयही अनेक शाळांनी घेतला आहे.