मुंबई : परप्रांतीयांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेने एल्गार केला आहे. आयपीएलच्या खेळाडूंची (IPL 2022) वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बसेसची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून (MNS) तोडफोड करण्यात आली. दक्षिण मुंबईतील चर्चगेट भागात असलेल्या ताज हॉटेल बाहेर (Hotel Taj) मनसे कार्यकर्त्यांनी या बस फोडल्या. बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंची ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. पण या बसेस महाराष्ट्राच्या बाहेरुन आणल्या जातात. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नाही. परंतु स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम देण्याची मागणी मनसेने या आधीपासूनच लावून धरली होती.
मनसेच्या मागणीला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी ‘खळ्ळ खट्यॅक’चा वापर केल्याचं दिसत आहे. मंगळवारी रात्री ताज हॉटेलबाहेर मनसे वाहतूक सेनेच्या सदस्यांनी महाराष्ट्राच्या बाहेरुन आलेल्या बसेस फोडत निषेध व्यक्त केला.
इंडियन प्रीमियर लीग 2022 चे वेळापत्रक (IPL 2022 Schedule) जाहीर झाले असून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात 26 मार्च रोजी पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहायला मिळेल, जो संध्याकाळी 7.30 वाजता खेळवला जाईल. आयपीएल 2022 लीगचा (Indian Premier League) शेवटचा सामना 22 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्जचे हे दोन संघ आमनेसामने असतील.
यावर्षी लीगमधील सर्व सामने देशातच खेळवले जाणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील.