मुंबई : आज तिथिनुसार शिवजंयती (ShivJayanti) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) जंयती ही तारीख आणि तिथी अशा दोनही प्रकारे साजरी केली जाते. देशासह राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे (Corona) सावट आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन गेले दोन वर्ष प्रत्येक सनोत्सवांवर राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निर्बंध घालण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून कोरोनाच प्रादुर्भाव कमी झाल्याने आणि कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने निर्बंधांमध्ये राज्य सरकारच्या वतीने काहीप्रमाणात सूट देण्यात आली होती. परंतु तरी देखील प्रत्येक उत्सवासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतात. आज तिथिनुसार शिवजंयती आहे. राज्याचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जंयती दिवशी राज्यात मोठा उत्साह असते. परंतु गर्दी झाल्यास पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढू शकतो, त्यामुळेच शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृहविभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना असलेले परिपत्रक काढण्यात आले आहे.
या परिपत्रकात असे म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. परंतु कोरोनाचे संक्रमण अद्यापही सुरूच असल्यामुळे तिथिनुसार येणारी शिवजयंती ही नागरिकांनी आपल्या आरोग्यची काळजी घेऊन कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरी करावी यासाठी काही मार्गदर्शक सूचना देत आहोत. या परिपत्रकात शिवजयंतीच्या अनुषंगाने स्पष्ट अशा सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र महाराष्ट्र शासन महसूल व अपत्ती व्यवस्थापन विभागाने दिनांक एक मार्च रोजी कोरोनासंदर्भांत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शिवजयंती साजरी करावी असे म्हटले आहे.