मुंबई: कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा (mns) मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे महापालिका निवडणुकीचं (bmc) रणशिंग फुंकण्याचीही चिन्हे आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत त्यांची तोफ पाडवा मेळाव्यात धडाडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज यांच्या या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून या मेळाव्यात राज यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे नेत्यांनी हा मेळावा आमच्यासाठी एक उत्सवच असल्याचं आधीच स्पष्ट केल्याने हा मेळावा अतिभव्य होणार असल्याचे आधीच संकेत मिळत आहेत.
मनसे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी या मेळाव्याची माहिती दिली. येत्या 2 एप्रिल रोजी शिवाजी पार्कवर हा मेळावा होत आहे. मनसेचा पाडावा मेळावा कोरोना काळानंतर होत आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा मोठा उत्सव असेल. या मेळाव्यासाठीच्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. दोन वर्ष जे काही चाललं आहे एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला अधिक महत्त्व आहे. या मेळाव्यातून राज ठाकरे सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने यंदाच्या पाडवा मेळाव्याला विशेष महत्व आहे, असं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं.
दरम्यान, महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जोरात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मनसेने मुंबईत अनेक नव्या शाखांची स्थापना केली आहे. राज ठाकरे यांच्या हस्ते या शाखांचं उद्घाटन करण्यात आलं आहे. आगामी काळातही मनसेच्या आणखी शाखांचं मुंबईत उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राज ठाकरे यांनी मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिक महापालिकांच्या निवडणुकीचा स्वत: आढावा घेतला आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणीही समजून घेतल्या आहेत. तसेच काही ठिकाणी पक्ष संघटनेत फेरबदलही केले आहेत. मनसेनेही मरगळ झटकून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केल्याने या निवडणुकांमध्ये विरोधकांसमोर मनसेचं आव्हान उभं ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत.