बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची चौकशी करणाऱ्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली डायरी सापडली आहे. अधिकार्यांना या डायरीत ५० लाख रुपयांचे घड्याळ आणि ‘मातोश्री’ला २ कोटी रुपयांची आणखी भेटवस्तू दिलेल्या नोंदी सापडल्या आहेत. मात्र, यशवंत जाधव यांनी डायरीतील नोंदींमध्ये ‘मातोश्री’ हा आपल्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, डायरीतील पहिली नोंद त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त घड्याळ वाटपाची होती आणि दुसरी नोंद गुढीपाडव्याला त्यांच्या आईच्या स्मरणार्थ गरजूंना भेटवस्तू वाटपाची होती, असं स्पष्टीकरण जाधवांनी दिलं आहे.
२५ फेब्रुवारी रोजी आयटी विभागाने केलेल्या झडतीदरम्यान ही डायरी जप्त करण्यात आली होती. दरम्यान, यशवंत जाधव हे बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष असून त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघातून आमदार आहेत. आयटी विभाग कंत्राटदार बिमल अग्रवाल यांच्या मालकीच्या न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विविध व्यवहारांची चौकशी करत आहे. यशवंत जाधव यांनी बीएमसीच्या विविध कंत्राटांसाठी ३० कोटी रुपयांची बिमल अग्रवाल यांची बाजू घेतल्याचा संशय आहे.
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, आयकर विभाग कोलकातामधील एका शेल कंपनीला दिलेल्या कर्जाच्या १५ कोटी रुपयांच्या परतफेडीची देखील चौकशी करत आहे. ही रक्कम बिमल अग्रवाल यांच्या कंपनीकडून जाधव यांच्या कंपनीला परत केली गेली होती. हे पैसे जाधव यांनी भाडेकरू असलेली आणि पगडी प्रणालीवर चालणारी हॉटेल आणि इमारत खरेदी करण्यासाठी वापरली, असे आयटी सूत्रांनी सांगितले. जाधव बीएमसीच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असताना हे सर्व व्यवहार २०१८ ते २०२२ दरम्यान झाले.
तसेच यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भायखळा येथील बिलाखडी चेंबर्समध्ये ३१ फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप आहे. जाधव यांनी इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना जाधव यांनी रोख रक्कम दिली आणि अमेरिका आणि कॅनडामधील दोन भाडेकरूंच्या बाबतीत ही रक्कम हवालाद्वारे हस्तांतरित करण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले. जाधव यांनी जमीन मालकाकडून बिलाखडी चेंबर्सची मालकी खरेदी करण्यासाठी ४ कोटी रुपये दिले.
बिमल अग्रवाल यांना काही वर्षांपूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने आणि नंतर अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. अग्रवाल २०१८ मध्ये तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आणि जाधव यांच्यासोबत काम करू लागला. जाधव यांच्या मदतीने अग्रवाल यांनी महामारीच्या काळात बीएमसीची ३० कोटी रुपयांची वेगवेगळी कंत्राटे मिळवली, अशी माहिती सूत्रांनी दिली. बीएमसीने बोलीद्वारे कंत्राट वाटप केले आणि यशवंत जाधव भायखळा भागात कामासाठी बोली लावू देत नव्हते, असे आयटीच्या सूत्रांनी सांगितल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने सांगितलं. दरम्यान, अग्रवाल यांना काम मिळावे म्हणून त्यांनी या भागातील बीएमसीचे कंत्राट जिंकलेल्या सूरजसिंग देवरा या कंत्राटदाराला धमकावले. जाधव देवरा यांना धमकी देत असल्याची ऑडिओ क्लिप २०२० मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
दरम्यान, गेल्या वर्षी, आयटी विभागाने यामिनी जाधवबद्दल स्वतंत्र तपासणी केली होती. ज्यामध्ये जाधव दाम्पत्याने कोलकातामधील शेल कंपनी प्रधान डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत १५ कोटी रुपयांची अवैध रक्कम वैध करून घेतली होती.
दरम्यान, जाधव यांच्याशी संबंधित चाळीस मालमत्तांचा तपास सुरू आहे. शिवाय आयकर विभागाने एप्रिल २०१८ पासून जाधव अध्यक्ष असतानाच्या तारखेपर्यंत स्थायी समितीने मंजूर केलेल्या करारांबाबत बीएमसीकडून माहिती मागवली आहे. तसेच सर्व कंत्राटदारांचा तपशील मागविण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात, आयटी अधिकार्यांनी माझगावमधील बिलाखडी चेंबर्समधील जाधव यांचं निवासस्थान, त्यांचे व्यावसायिक सहकारी बिमल अग्रवाल यांचे घर आणि बीएमसीच्या पाच खासगी कंत्राटदारांच्या जागेसह ३६ परिसरांची झडती घेतली. यामध्ये आयटीला १३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या किमान ३६ मालमत्तांचे तपशील सापडले आणि २ कोटी रुपयांची अज्ञात रोख आणि दीड कोटी रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
किरीट सोमय्यांनी केला होता मनी लॉण्ड्रिंगचा आरोप –
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारील महिन्यात यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले होते. यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटलं होतं.
“मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये रोख स्वरुपात मनी लॉण्ड्रिंग करणाऱ्या उदय शंकर महावारला दिले आहेत. हे पैसे प्रधान डिलर प्रा. लिमिटेडच्या खात्यात जमा करण्यात आले. या कंपनीचा एक रुपयांचा शेअर आणखी पाच कंपन्यांनी पाचशे रुपये दराने घेतला. हे सर्व बोगस होते. त्यानंतर हे पंधरा कोटी यशवंत जाधव आणि त्यांच्या कुटुंबाच्या खात्यामध्ये जमा झाले. त्यानंतर यशवंत जाधव यांनी हे पैसे संयुक्त अरब अमिराती येथे हलवले. त्यामुळे १५ कोटी रुपये रोख यशवंत जाधव यांनी दिले हे स्पष्ट होत आहे,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.