• उन्मेष गुजराथी
मुंबई : उल्लू या ऍपचे मालक व भारतातील कुप्रसिद्ध पॉर्न किंग विभू अग्रवाल यांच्यावर असंख्य एफआयआर दाखल झाले आहेत, तरीही हे मोकाट फिरत आहेत. या पॉर्न किंगने आता भारतीय कायद्यापासून पळवाट काढत एक नवीन ऍप लॉन्च केले आहे. हे ऍप संपूर्णपणे पोर्नोग्राफीला वाहिलेले आहे. यातून ते कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा करीत आहेत.
महाराष्ट्र पोलीस व सायबर सेल यांच्याशी आर्थिक संबंध ठेवून अग्रवाल आजही नियमबाह्य पद्धतीने अश्लील वेबसिरीजची निर्मिती करीत आहेत. या कुकर्मात त्याला लट्टूची सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट अंजली रैना साथ देत आहे. अंजली व विभू यांचे घनिष्ठ संबंध सर्वांनाच ठावूक आहेत.
लट्टू हे ऍप अग्रवालांच्या मालकीचे असून अंजली ते चालवत आहे. भारतीय कायद्यातून वाचण्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातून Lattu Australia PTY Ltd ही कंपनी स्थापन केली आहे. प्रत्यक्षात उल्लू व लट्टूचा सर्व्हरही एकच आहे. याशिवाय लेखक, नट - नट्या, डायरेक्टर व इतर स्टाफही एकच आहे व त्यांचे शुटिंगसह सर्व कामे मुंबईमधील उल्लूच्या अंधेरीच्या ऑफिसमधूनच चालतात.
लट्टू हे अप १२ प्लस म्हणजेच १२ वर्षांपुढील वयोगटातील प्रेक्षकांसाठी असून ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे (वास्तविक प्रौढांसाठी असणारा कन्टेन्ट हा १८ वर्षांपुढील वयोगटातील प्रेक्षकांसाठी असायला हवा.). इंडियन मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीनुसार हा गंभीर गुन्हा आहे. तरीही हा गोरखधंदा चालू आहे. याला साथ आहे ती महाराष्ट्र पोलीस आणि सायबर सेलचा.
सन २०२१ मध्ये रोशन गॅरी या डायरेक्टरने उल्लूचे मालक विभू अग्रवाल व त्यांच्या काळ्या कृत्यांविरोधात आवाज उठविला, प्रेस कॉन्फरन्स घेतली. मात्र थोड्याच दिवसांत तिला खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले. इतकेच नव्हे तर तिचा अपघात घडवून आणला, असा आरोप स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमने केला आहे.