मुंबई : मुंबई च्या मुंबादेवी जवळ प्रकाश शांतीलाल गन्ना - जैन यांचे 'शक्ती जेम्स अँड ज्वेलर्स' नावाचे दुकान आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजे ८ एप्रिल २०१२ रोजी या भामट्याने गोड बोलून काही सोने बनविणाऱ्या कारागिर व व्यापाऱ्यांना बोलावून घेतले. शंकर मंडल, सुरेश जव्हेरचंद शहा, परेश धानक, ज्ञानमल राखेचा, संजय जैन, नितीन शहा, सुशांतो कालिपोदो रॉय अशी या कारागिरांची नावे आहेत. त्यांना सोन्याचे दागिने दाखविण्यास सांगितले. यावर त्यांनी प्रकाश जैन व त्याचा मॅनेजर अनिल हस्तीमल परमार यांना तब्बल ११ किलो वजनाचे दागिने दाखवले. मात्र त्यावेळी त्यांनी हे दागिने पार्टीला दाखवतो, या बहाण्याने दागिने ठेवून घेतले. त्यानंतर आठवड्याने कारागिरांनी पैसे द्या किंवा दागिने परत करा, असा तगादा लावला. मात्र या भामट्याने दागिने तर परत केले नाहीच पण त्या दागिन्यांचे पैसेही दिले नाहीत. त्यानंतर हे प्रकरण एल. टी. मार्ग येथील पोलीस स्टेशनमध्ये गेले. एफआयआर रजिस्टर करण्यात आला. त्यानंतर १ महिन्यांनी या दोन आरोपीना अटक करण्यात आली.
या पोलीस स्टेशनमध्ये आरोपींना चार दिवस तुरुंगात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले. सध्या हे प्रकरण किल्ला कोर्टात आहे. या आरोपींनी हे पैसे आशीर्वाद बिल्डर्स, श्रीपती रेसिडेंसी, या कल्याण शीळ फाटा रोडवर बांधलेल्या बांधकाम प्रोजेक्टमध्ये गुंतवले, अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रोजेक्टमध्ये याआधीही एका कारागिराने २०१२ साली १५ लाख रुपये फ्लॅट खरेदी करण्यासाठी गुंतवले होते. हे पैसे अद्यापही दिले नसल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.
या प्रकरणाला आजमितीला १० वर्षे पूर्ण झाली. मात्र अद्यापही आरोपीना त्यांचे सोने अथवा पैसे परत मिळालेले नाही. पोलिसांनीही सदोष आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे हा आरोप सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे .
भपका किंवा अमिश दाखवून सोने किंवा पैसे घ्यायचे, त्यानंतर सोने परत मागितल्यास दमदाटी करायची, प्रकरण पोलिसांमध्ये गेल्यास पैसे देवून मॅनेज करायचे. चार दिवसांत जामीन घ्यायचा व एकदा का प्रकरण कोर्टात गेल्यास निष्णात वकील करायचा. त्यानंतर 'तारीख पे तारीख' हा खेळ वर्षानुवर्षे कोर्टात चालत राहतो. यामध्ये तक्रारदार कोर्टात फेऱ्या मारून व वकिलाचे पैसे भरून वैतागतो. बहुतांशी आरोपीच तक्रारदाराच्या वकिलाला पैसे देवून "मॅनेज' करतात. त्यामुळे केस लूज पडते, वर्षानुवषे चालत रहाते व आरोपीना न्याय काही मिळत नाही. या प्रकरणात नेमकी हीच मोडस ऑपरेंडी आरोपींनी वापरल्याचे पहायला मिळते.
तब्बल १० वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचे सोने घेवून हडप करणाऱ्या भामट्यांनी अद्यापही सोने अथवा पैसे दिले नाहीत. त्यामुळे या कारागिरांनी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी केली आहे.
प्रतिनिधी :- ( मुंबई )