खातेदाराचे बोगस सही शिक्के बनवल्या प्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या एका कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. तर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी उदय कोटक यांच्यासह ५ जण 'वॉन्टेड' आहेत.
जादा दराने व्याज आकारणी करण्यासाठी, खातेदाराचे बनावट सही - शिक्के वापरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी कोटक महिंद्रा बँकेच्या CEO सहित एकूण ६ जणांवर ८ मार्च रोजी गुन्हा दाखल झाला होता. कोटक यांच्यासह बॅंकेच्या लोणावळा शाखेचे तत्कालीन व्यवस्थापक व्हली फर्नांडिस, कर्मचारी सांप्रद कामत,अंबर दरबारी,अलंकार खरे,अभिजित मगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी अलंकार खरे यांना अटक करण्यात आली असून बाकी ५ जण 'वॉन्टेड' आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात बनावट कागदपत्रे बनविल्याचे सिद्ध झाले आहे. लोणावळा येथील हॉटेल व्यावसायिक अशोक भोपालसिंग पुरोहित यांनी या प्रकरणी तक्रार केली होती.
पुरोहित यांचे लोणावळा येथे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टच्या आवारातील दोन गाळे त्यांनी २०१३ मध्ये बँकेस भाड्याने दिले होते. बँक अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून अशोक पुरोहित व त्यांचे बंधू सुरेश पुरोहित यांनी बँकेत खातेही उघडले. त्यानंतर ‘लिज रेंटल डिस्काउनटिंग’नुसार कमी व्याजदराने कर्ज देतो असे सांगून, बँकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ६२ लाख ८६ हजार ३५६ रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर २०१४ मध्ये पुन्हा ३ कोटी कर्ज मंजूर केले. कर्जापोटी हप्तेही पुरोहित यांनी भरले. २०१८ मध्ये काही कारणाने अर्जासंदर्भात कागदपत्रांची मागणी केल्यानंतर पुरोहित यांना त्यात तफावत आढळून आली.
► अशी झाली फसवणूक
अशोक पुरोहित यांनी भाड्याने दिलेल्या गाळ्यांवर ‘लिज रेंटल डिस्काउनटिंग’नुसार १०.३० टक्के व्याज दरानुसार कर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ‘लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी’नुसार कर्ज मंजूर करीत १२ टक्के दराने व्याज आकारणी करण्यात आली. दुसऱ्या वेळी ११.३० टक्यांऐवजी ११.५० टक्के दराने व्याज आकारले. यामध्ये पुरोहित यांची तब्बल २० ते २५ लाखांची फसवणूक झाली. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाद न मिळाल्याने, पुरोहित यांनी पोलिसांत धाव घेतली.
कर्ज मंजूर प्रकरणात कागदपत्रांची ही फेरफार करण्यात आली. यासाठी अशोक पुरोहित व त्यांचे बंधू सुरेश पुरोहित यांच्याशी संबंधित कंपनीचे बनावट शिक्के व सह्यांचा वापर करण्यात आला, असे पुरोहित यांचे म्हणणे आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही या आरोपांची पुष्टी केल्याने, एकंदरीत बँकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.