प्रतिनिधी, १२ मे २०२२ :- अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आमदार रमेश लटके कुटुंबियांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे. आमदार रमेश लटकेंच्या निधनानं शिवसेनेला मोठा धक्का बसलाय.
रमेश लटकेंची कारकीर्द रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. रमेश लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून आले. त्यानंतर सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले. आमदार रमेश लटके यांनी तीन दिवसापूर्वी अंधेरी पूर्वेत होली फॅमिली ग्राउंड मध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमात मंत्री अनिल परब व मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते दुबईला आपल्या सहकुटुंब सोबत फिरायला गेले होते आणि काल दुबईमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.