प्रतिनिधी, २ जुलै २०२२ :- रविवार आला की, प्रवाशांच्या मनात मेगा ब्लॉकची चिंता असते. अनेक ऑफिसेस रविवारी बंद असले तरी अनेक ऐन सुट्टीच्या वाराला म्हणजे रविवारी कुठेतरी फिरण्याचा नक्की प्लॅन करतात मात्र मेगा ब्लॉक असल्याने अनेकांची निराशा होते. उद्या रविवार असल्याकारणाने कुठे कुठे मेगाब्लॉक असणार आहे त्याची माहिती आपण देणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान आणि पनवेल-वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. बोरिवली आणि भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान शनिवारी व रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान अप-डाउनची लाईन धीम्या गतीनेसुरु राहणार आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. याचा परिणाम असा होईल की, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील. पनवेल-वाशी दरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर दरम्यान अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे- वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ - खारकोपर सेवेवर ब्लॉकचा परिणाम होणार नाही. सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर या मार्गावर जलद गतीने सुरु असलेल्या रेल्वे बंद असणार आहेत. रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५ या दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. शनिवार-रविवार मध्यरात्रीच्या या ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.