बुधवार 31 ऑगस्ट 2022 पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपती उत्सव भाविकांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म स्वाती नक्षत्रात आणि सिंह राशीत झाला. त्यामुळे या दिवशी श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना करून भाविक श्रद्धेने त्यांची पूजा करतात. कालच गणरायांचं आगमन झाल्यानंतर आज १ सप्टेंबर २०२२ घरगुती गणपतींचं म्हणजेच दीड दिवसांच्या गणरायांचं विसर्जन होणार आहे. आता दीड दिवसांनी बाप्पाचं विसर्जन करण्याची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. अनेकांना वेळ नसतो, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. ही कारणं असली तरी दीड दिवसांनी गणरायाची मूर्ती विसर्जन करण्यामागची परंपरा आणि त्यामागील कारणं काही वेगळीच आहे. दीड दिवसांमध्येच गणराय परत का जातात? हा प्रश्न सर्वानाच पडतो. प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी या दीड दिवसांच्या गणपती विसर्जनामागील एक गोष्ट सांगितली. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची. पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जशी वर्षे जाऊ लागली तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाचा पायंडा पडू लागला. मात्र अनेक ठिकाणी चतुर्थीच्याच दिवशी मूर्तीपूजा करून तिचं विसर्जन करण्याची प्रथा आजतागत कायम ठेवण्यात आलीये. विशेष करून दक्षिणेकडील अनेक गावांत चतुर्थीच्या दिवशीचं मूर्तीचं विसर्जन करण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे सध्या जरी अनेकजण धावपळीचं कारण देत दीड दिवसच गणरायांचा पाहुणचार करत असले तरी त्यामागील मूळ कारण हे शेतीशी संबंधित आहे. त्यामधूनच पुढे ही दीड दिवसांच्या गणेशोत्सवाची प्रथा सुरु झाली.