नाशिक : बागलाण तालुक्यात वैद्यकीय सुविधांअभावी करोनाबाधित रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेउन जिल्हा परिषदेने ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे आदिवासी भागातील रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे . जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी तक्रारींची दखल घेऊन संबंधित केंद्रात रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली.
याबाबतची माहिती बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी दिली. बागलाण तालुक्यात करोनाने अक्षरश: थैमान घातले आहे.
१५ दिवसातच बाधित रुग्ण संख्येचा आकडा दोन हजार पार झाला आहे. १२० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत करोनाुक्त होणाऱ्या रुग्णांचा दर कमी आहे. खाटांची कमी संख्या, प्राणवायूचा तुटवडा यामुळे रुग्णांची उपचाराअभावी हेळसांड होत आहे. काही रुग्णांचा प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे आमदार बोरसे यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. आदिवासी बांधवांच्या सोयीसाठी ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना रुग्णालय कार्यान्वित करण्याची मागणी केली. याबाबत तत्काळ सुविधा न पुरविल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला होता.
या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० खाटांचे करोना रुग्णालय सुरू करण्यास मान्यता दिली. या रुग्णालयात ३० खाटांना प्राणवायूची सुविधा राहणार आहे. वाढीव खाटांमुळे मुल्हेर, आलियाबाद, साल्हेर या आदिवासी तसेच ताहाराबाद, अंतापूर, करंजाड, पिंपळकोठे, सोमपूर परिसरातील रुग्णांची सोय होणार असल्याचे बोरसे यांनी सांगितले.