४० हजारांच्या इंजेक्शनची अडीच लाखांना विक्री
नाशिक : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात रेमडेसिविर, टोसिलीझुमॅब सारखी इंजेक्शन, औषधे मिळवितांना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत असताना या स्थितीचा काही घटक गैरफायदा घेत असल्याचे उघड झाले आहे. प्रचंड मागणीमुळे रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी होत्या. आता टोसिलीझुमॅब या महागडय़ा इंजेक्शनची थोडी थोडकी नव्हे तर, तब्बल सहा ते सात पट अधिकने विक्री होत असल्याची बाब पोलीस कारवाईतून उघड झाली. अवैधरित्या या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चार संशयितांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
करोनाच्या उपचारात गंभीर रुग्णांना अतिशय महागडय़ा टोसिलीझुमॅब इंजेक्शनची गरज भासते. एक ते दीड महिन्यांपासून त्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी वाढली. त्याची परिणती रेमडेसिविरप्रमाणे टोसिलीझुमॅबच्या काळा बाजारात झाल्याचे दिसत आहे. ४० हजार रुपये किंमतीचे इंजेक्शन दोन लाख ६० हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती अन्न, औषध प्रशासनाला मिळाली होती. त्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने गंगापूर रस्त्यावरील एका रुग्णालयासमोर सापळा रचला.
बनावट ग्राहक पाठवत अन्न, औषध प्रशासन आणि पोलीस पथकाने संशयितांना रंगेहात पकडले. या कारवाईत संशयित संकेत सावंत (राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका), प्रणव शिंदे (पिंपळगाव बसवंत) आणि शुभम आणि अक्षय रौंदळ (सटाणा) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी संशयितांकडून ४० हजार ६०० रुपये किंमतीचे एक इंजेक्शन, आठ हजार रुपये रोख, दोन भ्रमणध्वनी, मोटार असा चार लाख ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात औषध नियंत्रण किंमत कायदा, अत्यावश्यक वस्तू अधिनियम औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यांतर्गत गुन्हा दाखला करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय लोंढे, श्रीराम पवार, कर्मचारी नांदुर्डीकर, नांद्रे, प्रकाश पवार यांच्या पथकाने केली.
प्रशासनाकडून आधीपासून व्यवस्था
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने रेमडेसिविर, टोसिलीझुमॅबसारख्या औषधांचा तुटवडा आहे. मध्यंतरी रेमडेसिविर मिळवण्यासाठी अनेक दिवस रांगा लागल्याचे पाहायला मिळाले होते. या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविरच्या वितरणासाठी खास कक्ष स्थापून ही इंजेक्शन थेट रुग्णालयांना मिळतील, अशी व्यवस्था केली. काही दिवसात ४० हजार रुपये किंमतीच्या टोसिलीझुमॅब इंजेक्शनबाबत तशीच स्थिती निर्माण झाली. बाधितांची संख्या वाढल्यामुळे मागणी वाढली. जिल्ह्यात टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रशासनाने नाशिक आणि मालेगाव महापालिका आणि नाशिक ग्रामीण या तीन भागात विभागणी केली. हे इंजेक्शन अतिशय तातडीच्या उपचारासाठी आवश्यक आहे. त्याचा तातडीने पुरवठा होण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचा अभ्यास करून ही इंजेक्शन थेट रुग्णालयास दिली जातील, अशी व्यवस्था कार्यान्वित आहे.