नाशिक : जिल्ह्याातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कांदा लिलाव पूर्ववत करण्यात आले. ग्रामीण भागात बाजार समित्यांमध्ये पूर्व नोंदणी केलेल्या वाहनांना प्र्रवेश देण्यात आला. त्यामुळे लासलगाववसह काही ठिकाणी बाहेरील बाजुला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसले. नाशिक बाजार समितीत वाहन नोंदणीची अट नसली तरी प्रत्येक कृषिमालाच्या लिलावाची वेळ निश्चित करण्यात आली होती. वेळेत न आलेल्यांनी बाहेरील रस्त्यावर माल विक्री केली. आवारात किरकोळ विक्रेते, भरेकऱ्यांना प्रतिबंध केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. कृषिमालाचे व्यवहार पूर्ववत झाल्यामुळे १२ दिवसांपासून नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
१२ दिवसांच्या कडक टाळेबंदी नंतर प्रशासनाने नियम, अटी लागू करून बाजार समितीत लिलाव सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने बहुतांश बाजार समित्यांमध्ये कृषिमाल, कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाले. लासलगावसह सटाणा, नामपूर बाजार समितीने माल घेऊन येणाऱ्या वाहनांना नोंदणी सक्तीची केली. सटाणा, नामपूर येथे तर करोना चाचणी अहवाल सक्तीचा केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी उमटली. शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने बहुतांश शेतकरी सरकारी दवाखान्यात जाऊनही त्यांना करोना चाचणीला सुटी आडवी आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अधिकच संताप व्यक्त करण्यात आला.
पहिल्या दिवशी अनेक बाजार समित्यांमध्ये गोंधळ उडाला. कांद्याच्या सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत सकाळच्या सत्रात नोंदणी करणाऱ्या ५०० वाहनांतील कांद्याचे लिलाव झाले. अनेक शेतकरी नोंदणी न करताच वाहन घेऊन आले. त्यांना आवारात प्रवेश दिला गेला नाही. सटाणा बाजार समितीत ४७५ कांदा वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र बहुतांश शेतकरी आणि वाहन चालकाकडे कोरोना चाचणीचा अहवाल नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.
प्रशासनाने तत्काळ प्रतिजन चाचणी संच उपलब्ध करून चाचणी घेण्यात आली. यावेळी दोन वाहन चालक बाधित आढळून आले. जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदी शिथिलतेबाबत पुढील आदेश येईपर्यंत बाजार समिती प्रशासनामार्फत वाहन चालक व शेतकऱ्यांची चाचणी केली जाणार असल्याचे सचिव भास्करराव तांबे यांनी सांगितले. दोन वेळा आवारात फवारणी केली जात आहे. बाजार समितींच्या आवारात नियमांचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी बाजार समित्यांवर टाकली गेली. त्यामुळे आजवर गर्दी, वा नियमांच्या उल्लंघनाकडे कानाडोळा करणाऱ्या बाजार समित्यांना आवारात नियमावलीचे पालन करणे क्रमप्राप्त ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नाशिकमध्ये समितीबाहेर गोंधळ
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत करोनासंबंधी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला गेला. कृषिमाल घेऊन येणाऱ्या वाहनासोबत एकाच व्यक्तीला प्रवेश, गरजेनुसार व्यापारी, आडते, हमाल, मापारी यांना प्रवेश, आवारातील किरकोळ विक्रीचे व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे आवारातील गर्दी बरिचशी कमी झाली. त्यात प्रत्येक कृषिमालाच्या लिलावाची वेळ निश्चित केली गेली. त्यावेळेत येणाऱ्या वाहनांना नियमानुसार प्रवेश दिला गेला. वेळेची मर्यादा पाळू न शकणाऱ्या वाहनांची अडचण झाली. दिंडोरी रस्त्यावरील बाजार समितीच्या रस्त्यावर अनेकांनी कृषिमालाची विक्री केली. सकाळी किरकोळ विक्रेते, भरेकरी यांना प्रवेश नाकारला गेल्याने गोंधळ उडाला. पहिल्या दिवशी आवक जेमतेम राहिली. आवक कमी असल्याने मालास दरही चांगले मिळाले. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार वांगी (२५० क्विंटल) आवक होऊन त्यास प्रति क्विंटलला सरासरी चार हजार रुपये, फ्लॉवर (१०२९ क्विंटल) १०७० रुपये, कोबी (५७०) १३६५, ढोबळी मिरची (३६०), ३१२५ रुपये, भोपळा (७८०) १७०० रुपये, कारले (३३०) तीन हजार रुपये, दोडगा (३३) ६०४० रुपये, गिलके (२१) ४१६५ रुपये असे दर होते.