१८ ते ४४ वयोगटातील साडेपाच लाख नागरिकांना लस देणार
नाशिक : १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी महापालिका प्रशासनाने स्पुटनिक या रशियन लस खरेदीत स्वारस्य दाखविले आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या निविदेत आलेल्या दरानुसार पाच लाख लसमात्रा खरेदीची तयारी दर्शविण्यात आली आहे. स्पुटनिक या नव्याने विकसित झालेल्या लशीत एका मात्रेने प्रतिकार शक्तीत वाढ होत असून तीच लस महापालिकेला मिळणार आहे.
रशियाच्या स्पुटनिक लशीचे देशात उत्पादन सुरू करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही लस खरेदी करण्यावर शिक्कामोर्तब केले. लसीकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आणि प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणावर भर देण्याबाबत बैठकीत विचार-विनिमय करण्यात आला. या वयोगटाचे शहरात अंदाजे पाच ते साडेपाच लाख नागरिक आहेत.
राज्यातील मुंबई, पुण्यासह इतरही काही महापालिकांनी लसीकरणासाठी जागतिक निविदा काढली असून नाशिक महापालिकेने स्वतंत्र निविदा काढल्यास त्यात आणखी वेळ जाऊ शकतो. त्यामुळे आधी लशीसाठी ज्या महापालिकेने जागतिक निविदा काढली आहे, त्यांच्या मागणीत नाशिक महापालिकेची लस मागणी समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आले. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाशी चर्चा केली. त्यांना रशियाच्या स्पुटनिक लशीसाठी एकाने पुरवठ्याची तयारी केली आहे. आणखी लस मिळाव्यात म्हणून निविदेला मुदतवाढ देण्याचे निश्चित करण्यात आले.
नाशिक महापालिकेने ती लस खरेदीची तयारी दर्शविल्याने मुंबई महापालिकेत निविदा भरणाऱ्या पुरवठादाराने महापालिका आयुक्त जाधव यांची भेट घेतली. संबंधिताकडून २१०० रुपये दर सांगितला गेला. निविदा प्रक्रिया अंतिम होताना मुंबई महापालिका जो दर निश्चित करेल तो दर देण्यास नाशिक महापालिकेने संमती दर्शविली आहे. बृहन्मुंबई महापालिकेला दिलेल्या दरानुसार पाच लाख लसमात्रा खरेदी करण्याची तयारी असल्याचे पत्र महापालिकेने पुरवठादारास दिले आहे.
रशियन स्पुटनिकच्या एका मात्रेने प्रतिकार शक्तीत वाढ होते. यामुळे लसीकरण जलदगतीने होईल. दोन वेळा नागरिकांना लसीकरणासाठी जाण्याची गरज पडणार नाही. महापालिका स्पुटनिक खासगी रुग्णालयांना उपलब्ध करणार आहे. करोनासाठी महागड्या औषधांवर मोठा खर्च करावा लागतो. तुलनेत प्रतिबंधक लस घेण्यास नागरिकही तयार आहेत. – कैलास जाधव (आयुक्त, महापालिका