महापालिकेच्या २०२१-२२ वर्षांसाठी २७६३ कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता; स्मार्ट सिटीकडील १५० कोटी परत घेणार, प्रत्येक प्रभागासाठी पाच कोटींची कामे
नाशिक : विकास कामांसाठी ३०० कोटींचे कर्ज, स्मार्ट सिटी कंपनीकडे पडून असणारे १५० कोटी रुपये परत घेणे, प्रत्येक प्रभागात प्रत्येकी पाच कोटीच्या अर्थात एकूण १६५ कोटींच्या कामांची निविदा प्रक्रिया महिनाभरात राबविणे अशी निवडणुकीच्या तोंडांवर कामे आणि निधीची सांगड घालत महापौर सतीश कुलकर्णी यांनी स्थायी समितीने २०२१-२२ या वर्षांसाठी सादर केलेल्या २७६३.८१ कोटींच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली. निवडणुकीला सामोरे जायचे असल्याने सत्ताधारी भाजपने भरीव तरतूद करताना विकास कामांचा बार उडवून देण्याचे नियोजन केले आहे. दुसरीकडे करोना काळात प्रशासनाकडून कोटय़वधी रुपयांची खरेदी झाली. या खरेदीची चौकशी होऊ शकते, असा इशाराही महापौरांनी दिला आहे.
सोमवारी महापौर कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पीय सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिकेचे २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे २३६१ कोटी रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. निवडणूक वर्ष असल्याने स्थायी समितीने विविध विकास कामांसाठी ४०२ कोटींची वाढ सूचवल्याने ते २७६३ कोटींवर गेले. या वर्षांत २७६३.८१ कोटी अपेक्षित जमा तर २७५९.९८ कोटी अपेक्षित खर्च गृहीत धरण्यात आला असून ३. ८३ कोटीचे शिलकीचे हे अंदाजपत्रक आहे. स्थायी सभापती गणेश गिते यांनी शहरातील नागरिकांवर घरपट्टी, पाणीपट्टीतील कुठलीही करवाढ करण्यात आली नसल्याचे नमूद केले.
मध्यंतरी क्रिसील संस्थेकडून महापालिकेचे मूल्यमापन करण्यात आले. त्यांच्या अहवालानुसार विकास कामांसाठी ३०० कोटींचे कर्ज काढण्यास मान्यता देण्यात आली. स्मार्ट सिटी कंपनीकडे महापालिकेचे २०० कोटी रुपये पडून आहेत. त्यातील १५० कोटी रक्कम परत घ्यावी. कंपनीची कामे जशी मार्गी लागतील, तसे टप्प्याटप्प्याने ही रक्कम परत करता येईल. प्रत्येक प्रभागासाठी पाच कोटी यानुसार एकूण १६५ कोटींची कामांची यादी करण्यात आली आहे. एक महिन्याच्या आत कामाच्या निविदा काढाव्यात, असेही महापौरांनी बजावले. दारणा धरणातून पाणी उचलण्यास मर्यादा येतात. त्यामुळे गंगापूर धरणात शहरासाठी ३०० दशलक्ष घनफूट अतिरिक्त आरक्षण मिळावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
नवीन रुग्णालय, प्राणवायू प्रकल्प
पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक विभागात १०० खाटांचे रुग्णालय, प्राणवायू प्रकल्प तसेच मनपा रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात व्हेंटिलेटरसाठी १२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. करोनाच्या पार्श्वभूमी वर, रुग्णालय व्यवस्थापन, नवीन उपकरणे, साहित्य खरेदी, प्रयोगशाळा आदींकडे लक्ष देण्यात आले.
नगरसेवकांना एक कोटीचा निधी
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांना खूष करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विकास कामांसाठी प्रत्येकी ४० लाखाचा निधी देण्याचे स्थायी सभापतींनी म्हटले होते. महापौरांनी यामध्ये वाढ करीत एक कोटीहून अधिकचा निधी उपलब्ध करणार असल्याचे म्हटले आहे.
पेठ रस्ता, दिंडोरी नाक्यावर उड्डाणपूल
पेठ रस्त्यावरील शरदचंद्र पवार बाजार समितीसमोर तसेच दिंडोरी नाका येथील वज्रेश्वरी झोपडपट्टी येथे उड्डाण पूल बांधण्यासाठी तरतूद करण्यात आली. पंचवटी विभागासह इतर ठिकाणच्या रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करण्यासाठी वेगळी तरतूद करण्यात आली.
नववसाहतीत पथदीपांसाठी १७.३० कोटी
नव्याने विकसित होणाऱ्या वसाहतींमध्ये पथदीपांसाठी १७.३० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.