नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाईचे सत्र राबविले. तीन महिन्यात मुखपट्टी परिधान न करणे, सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळणे आणि काल मर्यादा वा तत्सम नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली गेली. या माध्यमातून तीन महिन्यात हजारो जणांवर कारवाई करून तब्बल ९३ लाख ८१ हजार ७१४ रुपयांची दंडात्मक रकमेची वसुली करण्यात आली. तथापि, त्यामुळे नागरिकांमध्ये शिस्त लागली, असे मात्र झाले नाही.
टाळेबंदी शिथीलीकरणात सोमवारपासून हळूहळू सर्व व्यवहारांना चालना दिली जात आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व घटकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे महत्वाचे आहे. निर्बंध शिथील झाले की, नियमांचा विसर पडतो. कठोर टाळेबंदीतही अनेक जण विनाकारण भटकंती करताना सापडले होते. दैनंदिन व्यवहार सिमित वेळेत सुरू झाले असताना बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. खरेदीसाठी येताना अनेक जण लहान मुलांनाही घेऊन येतात. त्यातील अनेकांना मुखपट्टी परिधान केली जात नसल्याचे चित्र पहिल्याच दिवशी दिसले. करोनाच्या नियमांचे पालन व्हावे म्हणून पोलीस, महापालिका यंत्रणा प्रयत्नरत आहेत. मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांवर मध्यंतरी दंडात्मक रकमेत वाढ केली गेली. नंतर दंड कमी करण्यात आली. या दोन्ही काळात मुखपट्टी विना भ्रमंती करणारे, मुखपट्टी हनुवटीवर लटकवणारे अनेक महाभाग होते. शहर पोलिसांनी मागील तीन महिन्यातील कारवाईची आकडेवारी पाहिल्यास नियम पालन न करणाऱ्यांचा अंदाज येईल.
मार्च ते चार जून २०२१ या कालावधीत शहरात १४ हजार ९३१ जण मुखपट्टीविना भ्रमंती करतांना सापडले. संबंधितांवर ६१ लाख ५७ हजार ४६१ रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. बाजारपेठांसह सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित नियमांचे पालन केले जात नाही. सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळणाऱ्या २११४ जणांवर कारवाई केली गेली. त्यांच्याकडून १२ लाख ४५ हजार २५३ रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांप्रमाणे अनेक आस्थापनांनी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन केले नाही. हॉटेल निम्म्या क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी असतांना अनेक ठिकाणी ती खच्चून भरल्याचे कारवाईत समोर आले होते. वेळेची कालमर्यादा, ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून दक्षता अशा अनेक बाबी आस्थापनांनी धाब्यावर बसविल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५२२ आस्थापनांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांना १९ लाख ७९ हजार रुपयांचा दंड केला गेला.
एप्रिलमध्ये कारवाई अधिक
मध्यंतरी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची करोना चाचणी करण्याची मोहीम पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने राबविली. त्या अंतर्गत ६८६५ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २९४ बाधित रुग्ण सापडले. तर ६६४१ जणांची चाचणी नकारात्मक आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मागील तीन महिन्यातील कारवाईची तुलना केल्यास एप्रिलमध्ये सर्वाधिक कारवाई झाल्याचे दिसून येते. एप्रिल महिन्यात मुखपट्टी परिधान न करणारे ६३२८, सुरक्षित अंतराचे पथ्य न पाळल्याप्रकरणी ६२०, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना २९१ यांच्यावर कारवाई करण्यात आली. या महिन्यात ३१०४ जणांची करोना चाचणी करण्यातआली.