नाशिक : शिक्षणाचे नाव काढताच डोळ्यासमोर बाकावर बसलेले मुले..फळ्यावर शिकविणारे शिक्षक हे चित्र डोळ्यासमोर येते. परंतु, दीड वर्षांत करोनाने हे चित्र बदलले. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षक आधुनिक तंत्राला सामोरे जात असतांना त्यांच्यात एक प्रकारची दरी निर्माण झाली आहे. यामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर प्रकाशझोत टाकणारा अॅम आय ऑडीबल? हा लघुपट नाशिककरांनी तयार के ला आहे.
स्थानिक कलाकारांसह आनंद निके तनमधील विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. करोनाकाळात माणसा-माणसात अंतर निर्माण झाले. अविश्वासाची अदृश्य भिंत निर्माण झाली. यातच ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा उदय झाला. एका अदृश्य भिंतीआड मैलो दूरचा विद्यार्थी पुन्हा शिक्षक आणि शिक्षणप्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न सुरु झाला. मूलभूत सुविधा न पोहचलेल्या भागात या मोठय़ा बदलांनी तेथील विद्यार्थ्यांंसमोर एक नवीन संकट उभे राहिले. आपत्कालीन परिस्थितीतही शिक्षण सुरु रहावे हा सरकारचा प्रयत्न आहे. ऑनलाईन पर्याय असला तरी सर्वाना तो परवडण्यासारखा नाही.
साधनांचा, जागेचा अभाव, आर्थिक दुर्बलता हाही विषय. ग्रामीण, दुर्गम भागातला शिक्षणासाठीचा या करोनाकाळातला संघर्ष अतिशय वेगळ्या पातळीवरचा होता. एका घरात एखादाच भ्रमणध्वनी. तोही वडिलांचा. रिचार्ज करण्यासाठी वीज नाही. यातूनही निभावलंच तर संपर्क होईलच याचा भरवसा नाही. अशा वेगळ्या संकटात विद्यार्थी अडकला. विद्यार्थ्यांंपर्यंत पोहचता न येणं ही शिक्षकांची अडचण. शिक्षण क्षेत्रातील या मोठय़ा आपत्तीची आणि वेगवेगळ्या पातळीवरच्या मर्यादा, वेदना, हतबलता, उद्विग्नता आणि संघषाची गोष्ट म्हणजे हा लघूपट आहे.
प्रा. वाय. डी. पिटकर यांच्या अॅम आय ऑडीबल या दोन ओळीच्या फेसबुक पानावरील संदेशातून या लघूपटाची कल्पना सुचली. २७ वर्ष स्वत: ही शिक्षणक्षेत्राशी संलग्न असल्याने या स्थित्यंतराने आणि ग्रामीण विद्यार्थ्यांंच्या वेदनेने अस्वस्थ झालो, ती अस्वस्थताच या लघुपटामागची खरी प्रेरणा ठरली असल्याचे नाशिकचे वास्तूविशारद विजय पवार यांनी सांगितले. या लघूपटाची भाषा म्हटलं तर इंग्रजी पण, हा वैश्विक प्रश्न जगभरातल्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहचावा म्हणून संवादांपेक्षा चित्रभाषेचाच प्रामुख्याने वापर केला असल्याचे ते म्हणाले
या विषयावर त्यांनी शिक्षण आणि चित्रपट या क्षेत्रातल्या कितीतरी तज्ज्ञांशी चर्चा केली. वैभव नरोटेंसोबत या लघुपटाची निर्मिती केली. या लघूपटाची नऊ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. त्यामुळे हा प्रश्न पेठ, सुरगाणा, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील न रहाता जगभरातल्या अशा कितीतरी दुर्दैवी विद्यार्थ्यांंचा झाला आहे. करोना काळात शिक्षक, विद्यार्थ्यांचा हरवलेला संवाद हा या लघुपटाचा गाभा आहे. नुकतीच या लघूपटाची निवड मुंबईत होणाऱ्या इंडियन पॅनोरमा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी झाली. विजय पवार लिखित, दिग्दर्शित आणि वैभव सुनील नरोटे निर्मित या लघुपटात नाश्क्किच्या आनंद निकेतन शाळेचे समिधा गर्दे, कबीर पाटील, चिन्मय कुलकर्णी, माही टक्के,भैरवी साळूंके, स्वानंद जोशी, क्षितीजा रकिबे, युगा कुलकर्णी, निर्मला स्कूलचा जोतिरादित्य पवार, आर्यन, चिन्मय, वासूदेव, आयुष या विद्यार्थ्यांंनी तसेच अजित टक्के, निष्ठा कारखानिस, चारुदत्त नेरकर, विजय पवार यांच्या भूमिका आहेत. प्रविण पगारे यांनी छायाचित्रण, आदित्य रहाणे—संकलन, शुभम जोशी— संगीत तर गणेश शिदे, प्रा.संकल्प बागुल यांनी प्रसिद्धीची बाजू सांभाळली आहे.