नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरूवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील करोना स्थिती आणि खरीप हंगाम, पीक कर्ज वाटप आदींचा आढावा घेणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका उभा ठाकलेला आहे. आजही जिल्ह्यात दोन हजार ५११ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. दररोज १०० ते १५० च्या दरम्यान नवीन रुग्ण आढळतात. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, कार्यबल गटाच्या निर्देशानुसार प्राणवायूची वाढीव उपलब्धता, लहान बालकांवरील उपचारासाठी व्यवस्था आदींवर काम सुरू आहे. बैठकीत त्यावर विचार विनिमय होईल.
याचवेळी खरीप हंगाम नियोजन कर्ज वाटपाबाबतही आढावा घेतला जाणार आहे. जून जवळपास कोरडा गेला. काही तालुक्यांचा अपवाद वगळता कुठेही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरण्या १० टक्क्यांच्या पुढे सरकल्या नाहीत. त्यात जिल्हा बँकेकडून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. मागील आठवडय़ात याच संदर्भात मंत्रालयात बैठक झाली होती. कर्जमुक्ती योजनेतून मिळालेल्या रकमेतील केवळ ३० टक्के रक्कम बँकेने कर्ज देण्यासाठी वापरली. संचालक मंडळाच्या कारभारामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी अधिकाधिक कर्ज पुरवठा करण्याची सूचना पवार यांनी आधीच केलेली आहे. पीक कर्ज मिळत नसल्याने विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू आहेत. या स्थितीत पीक कर्ज वितरणाच्या तिढय़ावर तोडगा निघणार काय, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, आमदार अॅड. माणिक कोकाटे यांची कन्या सिमंतिनी यांच्या विवाह सोहळ्यासही उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित राहणार आहेत.