नाशिक : देशातील नामांकित नाशिकरोड रेल्वे स्थानकाला चकचकीत करण्यास दोन वर्षांपूर्वीच सुरुवात झाली असली तरी आता या स्थानकाचा जुना बाज जाऊन ते तीन मजली करण्यात येणार आहे. विखुरलेली कार्यालये एक खिडकी योजनेसारखी एकत्र आणण्याचे तसेच व्यावसायिकदृष्टय़ा संकु ल उभारण्याचे नियोजन केले जात आहे.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाच्या सहा जणांच्या पथकाने नाशिकरोड रेल्वे स्थानकाची याबाबत नुकतीच पाहणी के ली. या प्राधिकरणाने टाटा कन्सल्टन्सीच्या (टीसीएस) सहकार्याने विविध रेल्वेस्थानकांचा व्यावसायिकदृष्टय़ा विकास सुरू केला आहे. भुसावळ विभागात सर्वात पहिले सर्वेक्षण नाशिकरोड रेल्वेस्थानकाचे झाल्याची माहिती स्थानक प्रमुख आर. के. कुठार यांनी दिली.
समाजाशी नाळ कायम ठेवत जास्तीत जास्त नफा हे उद्दिष्ट रेल्वेने ठेवले आहे. भारतात रेल्वेची हजारो एकर जमीन आहे. त्यातील कित्येक पडून आहे. त्यामुळे कोटय़वधीच्या महसुलावर पाणी सोडावे लागते. या जमिनीवर आधुनिक व्यावसायिक संकु ल, प्रतीक्षालय, आधुनिक चेहरा असलेली रेल्वेची कार्यालयेच सुरू के ली जाणार आहेत. स्थानकातील सर्व कार्यालये एकाच बहुमजली इमारतीत आणण्याचे नियोजन सुरू आहे. हे वेगळे रूप देण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची मदत घेतली जात आहे. पाहणी अहवाल टीसीएसला दिल्यानंतर त्यावर आराखडा आणि कृती के ली जाणार आहे.
प्राधिकरणाच्या पथकाने नाशिकरोड स्थानकातील पार्सल, तिकीट नोंदणी, इंजिनीअरिंग, मालधक्का, वाणिज्य विभाग आदींची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकरोड स्थानकातून १० वर्षांत किती प्रवाशांनी प्रवास केला, किती मालाची वाहतूक झाली, कुंभमेळ्यात किती प्रवासी आले, किती गाडय़ा धावल्या आदींचा आढावा घेऊन भविष्यात यामध्ये होणारी वाढ, त्यासाठी लागणाऱ्या सुविधा याची माहिती संकलित करण्यात आली. स्थानकातील कार्यालये विखुरलेली आहेत. आरक्षणासाठी सिन्नरफाटा येथे तर तिकीट नोंदणी मुख्य स्थानकात आहे. पार्सल एकीकडे तर मालधक्का दुसरीकडे आहे. इंजिनीअरिंग आणि सिग्नल विभाग वेगवेगळ्या ठिकाणी आहे. ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणून कर्मचारी, प्रवासी यांचा वेळ, ऊर्जा वाचविण्यात येणार आहे.
प्राणवायू उद्यान, सीसीटीव्ही कक्ष, चार वाहनतळ, नवीन पादचारी पूल, तीन स्वयंचलित जिने, तीन उद्वाहक, पैसे टाकताच तिकीट देणारे यंत्र, शुद्ध पाण्यासाठी तीन यंत्रे बसविण्यात आली आहेत.
आधुनिक सशुल्क वातानुकू लित कक्षही आहे. सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प गेल्या आठवडय़ात पूर्ण झाला असून सांडपाण्याचा पुनर्वापर सुरू केल्याने पाणीपट्टीत बचत होत आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती, अपंग प्रवासी आणि हमालांसाठी बॅटरीवरील प्रदूषणमुक्त गाडय़ा उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्या चारही फलाटावर पोहोचू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे.