नाशिक : अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, भ्रमणध्वनी अॅपद्वारे तिकीट-पास काढण्याची सुविधा, मध्यवर्ती केंद्रातून बसवर देखरेख, आवश्यकतेनुसार फे ऱ्यांचे नियोजन, मदत वाहिनी आणि तक्रार करण्याची सुविधा, असे विविध वैशिष्ठ्ये सामावणारी नाशिक महापालिकेची ‘सिटी लिंक’ ही शहर बस सेवा गुरूवारपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात नऊ मार्गांवर ही सेवा ४६ बसच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. नंतर टप्प्याटप्प्याने मार्गांसह बसेसची संख्या वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सिटीलिंक मार्फत अद्ययावत सीएनजी गाड्या चालविल्या जाणार असून दोन कंपन्यांच्या मदतीने पाच टप्प्यात एकूण २५० बसची सेवा उपलब्ध केली जाणार आहे. यात ५० बस या कमी प्रवासी क्षमतेच्या अर्थात ‘मिनी’ डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. नाशिकरोड आगारातून ३१ वेगवेगळ्या मार्गांवर तर तपोवन आगारातून ३२ वेगवेगळ्या मार्गांवर बस सेवेचा पुढील काळात विस्तार करण्यात येणार आहे. शहर बस सेवेसाठी तपोवन, निमाणी, सीबीएस, नाशिकरोड आणि भगूर बसस्थानकावरून फे ऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. शहर आणि लगतच्या २० किलोमीटरच्या परिसरात जवळपास १३९० बस थांबे आहेत. या बसथांब्यांवर १६० इतके प्रवासी निवारा शेड आहे. तसेच ३५० प्रवासी शेड पूर्णपणे नव्याने बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित ८८० बस माहिती दर्शक थांब्यांवर खांब बसविले जाणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
अॅपवर तिकीट, पास काढण्याची सुविधा
प्रवाशांसाठी सिटीलिंक या नावाने भ्रमणध्वनी अॅप उपलब्ध करण्यात आले आहे. या अॅपद्वारे तिकीट नोंदणी, पास, सेवेविषयी प्र्रतिसाद, मदत वाहिनी आदी सुविधा उपलब्ध होतील. शिवाय प्रवाशाला आपण कुठे आहोत, बस मार्गांची माहिती मिळेल. भ्रमणध्वनीवर तिकीट व पास काढता येणार आहे. बस सेवेसाठी महापालिकेने सिटीलिंक नावाने संकेतस्थळही सुरू केले आहे. याद्वारे बसचे मार्ग, वेळापत्रक आदी माहिती मिळणार आहे. बस सेवेविषयी काही तक्रार असल्यास पवासी लिखीत स्वरूपात, भ्रमणध्वनी अॅप, व्हॉट्सअॅप, संकेतस्थळ, मदतवाहिनी आदींवर देऊ शकतील.
विना तिकीट प्रवासाचा वाहक-प्रवाशाला दंड
बस सेवा सुरळीत राखण्यासाठी १६ मार्ग तपासणी पथक तयार करण्यात आले आहे. विना तिकीट प्रवासी, पासचा कालावधी आदींची तपासणी पथके करतील. एखादा प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळल्यास पथके दंड वसूल करतील. हा दंड वाहक व प्रवासी या दोघांकडून वसूल केला जाणार आहे. ३०० रुपये हा दंड असून अतिरिक्त जीएसटी कराचे ५४ रुपये असा राहणार आहे. प्रवाशाकडून बसच्या संपूर्ण मार्गाचे भाडे वसूल केले जाईल.
नऊ मार्गांवर सेवा
मनपाची शहर बस सेवा एकूण ६३ मार्गांवर देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तपोवन ते बारदान फाटा, तपोवन ते सिम्बॉईस महाविद्यालय, तपोवन ते पाथर्डी गाव, सिम्बॉईस महाविद्यालय ते बोरगड, तपोवन ते भगूर, नाशिकरोड ते अंबड गाव, नाशिकरोड ते निमाणी, नाशिकरोड ते बारदान फाटा, नाशिकरोड ते तपोवन या मार्गांचा समावेश आहे. यासाठी ४६ बसचा वापर केला जाईल.