नाशिक : नोटांची छपाई करणाऱ्या येथील चलार्थपत्र मुद्रणालयातील (सीएनपी) ५०० रुपये मूल्य असलेल्या नोटांचे १० बंडल म्हणजे तब्बल पाच लाख रुपयांचा तपास लागत नसल्याचे उघड झाले आहे. १२ फेब्रुवारीपासून या नोटांचा तपास न लागल्याने मुद्रणालयाने समिती नेमून चौकशी केली. अखेर पोलिसांत तक्रार देण्यात आली. मुद्रणालयात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) सुरक्षा व्यवस्था आहे.
नाशिक रोड येथे चलनी नोटांची छपाई करणारे हे मुद्रणालय आहे. सुमारे १२०० कामगार काम करतात. १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुद्रणालयातून ५०० रुपये मूल्य असलेल्या नोटांचे १० बंडल असे एकूण पाच लाख रुपये गहाळ झाल्याची तक्रार व्यवस्थापनाने दिली. हा प्रकार लक्षात आल्यावर व्यवस्थापनाने सत्यशोधन समिती नेमली होती. मुद्रणालयात नोटांची मोठय़ा प्रमाणात बंडले असतात. अनेकदा त्यांची सरमिसळ होते. त्या अनुषंगाने गहाळ नोटांचा शोध घेतला गेल्याचे कारण मुद्रणालयाने दिले आहे. दरम्यानच्या काळात सत्यशोधन समितीने कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले, पण नोटांविषयी माहिती मिळाली नाही. दक्षता विभागाने तसेच पत्र पाठविले होते. तक्रार दाखल करताना मुद्रणालयाने चौकशी अहवाल पोलिसांकडे सोपविला आहे. त्याआधारे पुढील तपास केला जाईल. शिवाय मुद्रणालयात सर्व विभागात, आवारात सीसीटीव्हीचे जाळे आहे. त्यांचे चित्रणही ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील चलार्थपत्र आणि भारत प्रतिभूती ही दोन मुद्रणालये येथे आहेत. मुद्रांक घोटाळ्यावेळी भारत प्रतिभूती मुद्रणालय चर्चेत आले होते.
फेब्रुवारी महिन्यात चलार्थपत्र मुद्रणालयातून पाच लाख रुपयांच्या नोटा गहाळ झाल्या. समितीमार्फत चौकशी केली. पण त्या नोटा सापडल्या नाहीत. प्राप्त झालेल्या अहवालाचा पोलीस अभ्यास करीत आहेत. मुद्रणालयातील सीसीटीव्ही चित्रणही ताब्यात घेतले जाणार आहे. नोटांची बंडले गहाळ झाली की चोरीला गेली हे तपासात उघड होईल.
-विजय खरात ,उपायुक्त, नाशिक शहर पोलीस