नाशिकः नाशिकमधल्या गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात एका अवघ्या बारा वर्षांच्या मुलासह दोन तरुणांचा समावेश आहे.
पहिली घटना रामकुंडाजवळच्या गांधी तलावात घडली. यात उत्तम नगरमधल्या गणेश कॉलनीतले महाजन कुटुंब देवदर्शनासाठी आले होते. या कुटुंबातील रावसाहेब महाजन (वय 36) यांचा पाय घसरला आणि ते गोदापात्रात कोसळले. त्यांना शोधण्यासाठी जीवरक्षक जवानांनी खूप प्रयत्न केले. मात्र, पाण्याची पातळी जास्त असल्याने त्यांना अपयश आले. खूप उशिराने त्यांचा मृतदेह हाती लागला. रावसाहेब यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील, भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. दुसऱ्या घटनेत पाण्यात पडलेले रावसाहेब महाजन यांचा शोध घेताना जीवरक्षक जवानांना एक मृतदेह आढळला. पोलिसांनी याप्रकरणी तपास केला असता, तो ओवेस नदीम खान या अवघ्या अठरा वर्षांच्या तरुणाचा असल्याचे समजले. तिसऱ्या घटनेत साहील सलीम अन्सारी या अवघ्या बारा वर्षांच्या मुलाचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला. तो नाशिकमधल्या बुधवार पेठेत रहायचा. साहील हा घरात कोणालाही न सांगता गोदापात्रावर अंघोळीला गेल्या असल्याचे समजते. त्यात पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
गोदापात्राकडे फिरकू नका
नाशिकमध्ये महिनाभरापासून जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ओसंडून भरली आहेत. गंगापूर धरणातून गोदापात्रात पाणी सोडणे सुरू होते. त्यामुळे गोदावरी नदीही ओसंडून वाहत आहे. हे ध्यानात घेता गोदापात्राकडे फिरकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक धरणांवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. धरण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
यापूर्वी तिघे बुडाले
नाशिकमध्ये यापूर्वी पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात नांदगावमध्ये पांझण नदीच्या पुलावरून नीलेश परदेशी (वय 31) हा तरुण वाहून गेला आहे. दिंडोरीतील गणेश गुंबाडे (वय 22) या तरुणाचा पालखेडच्या कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेतातल्या टोमॅटोवर फवारणी केल्यानंतर गणेश अंघोळीसाठी कालव्यात उतरला होता. कालव्यातून बाहेर निघताना लोखंडी रॉडचा धक्का लागल्याने तो पुन्हा कालव्यात पडला आणि त्याचा मृत्यू झाला.