नाशिक: परिसराची दृश्यमान वैशिष्टय़े लक्षात घेऊन हिरवाईने सजलेल्या एमईटी भुजबळ नॉलेज सिटी या नव्या संमेलन स्थळातील काही जागा आपल्याच कार्यक्रमासाठी मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. कवी कट्टय़ासाठी निश्चित झालेली खुल्या प्रेक्षागृहाची जागा बालकुमार मेळाव्यासाठी देण्याची मागणी करण्यात आली. हा तिढा सुटत नाही, तोच आणखी एक-दोन समित्या आपल्या कार्यक्रमाची जागा बदलून देण्याची मागणी करीत असल्याने संयोजक बुचकळय़ात पडले आहेत.
३ ते ५ डिसेंबर या काळात येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीने वेग घेतला आहे. संमेलनासाठी स्थापलेल्या ४० समित्यांची बैठक रविवारी पार पडली. आडगावस्थित एमईटी भुजबळ नॉलेज सिटी या भव्य शैक्षणिक संकुलाचा सभोवतालचा परिसर शेतीने बहरलेला आहे. कवी कट्टा संकुलातील अंतर्गत भागातील खुल्या जागेत रंगणार आहे. एका बाजूला व्यासपीठ आणि सभोवतालच्या पायऱ्यांमुळे आसनव्यवस्था आहे. या ठिकाणी सलग दोन रात्री म्हणजे तीन दिवस कवी कट्टा सुरू ठेवत विक्रम करण्याचा संयोजकांचा मानस आहे.
ही जागा बालसाहित्यासाठी देण्याची मागणी मध्यंतरी बालकुमार मेळावा समितीने केली होती. या संमेलनात बालसाहित्याला प्रथमच वेगळी ओळख मिळणार आहे. त्यामुळे कवी कट्टय़ाची जागा देण्याचा आग्रह समितीचे समन्वयक संतोष हुदलीकर यांनी केली. तथापि, कवी कट्टा हा संमेलनातील महत्त्वाचा भाग आहे. तिथे येणाऱ्या रसिकांची संख्या अधिक असते. शिवाय, कवी कट्टय़ाची जागा साहित्य महामंडळाने निश्चित केलेली असल्याने ती देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे कवी कट्टा समितीचे प्रमुख संतोष वाटपाडे यांनी म्हटले आहे.
या विषयावर संयोजकांनी कवी कट्टय़ाच्या जागेत बदल होणार नसल्याचे सांगून पडदा टाकला होता. रविवारी कार्यक्रम स्थळाचे अवलोकन झाल्यानंतर एक-दोन समित्यांनी जागा बदलून देण्याची विनंती केल्याचे सर्व समित्यांचे समन्वयक विश्वास ठाकूर यांनी सांगितले.
मराठी साहित्य संमेलन भुजबळ नॉलेज सिटीतच व्हावे, असा आमचा आग्रह नव्हता. यानिमित्ताने साहित्य रसिकांची सेवा करायला मिळेल, हा आनंद असल्याचे स्पष्ट करीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्थळबदलाविषयी चाललेल्या चर्चावर भाष्य केले. कवी कट्टय़ासाठी निश्चित झालेली जागा.