नाशिकः नाशिकमधील देवळाली छावणी परिषदेत (Deolali Camp) आता कोणालाही प्रवेश मिळणार नाहीय. त्यासाठी आधी संबंधित अधिकाऱ्याची भेट घेऊन लेखी परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर येथे प्रवेश मिळेल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी दिली आहे. त्यामुळे उठला की निघाला छावणीत आणि मिळाला प्रवेश असे आता येथून पुढे तरी होणार नाहीय. त्यामुळे तुम्हीही काही काम असेल, तर अगोदर तसे नियोजन करा. अन्यथा छावणीचा हेलपाटा नक्कीच होऊ शकतो.
कशामुळे घेतला निर्णय?
नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. हे पाहता देवळाली येथील छावणी परिषद जागरूक झाली आहे. कोरोनाचा या परिषदेत शिरकाव होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. तेच पाहता हा नवा निर्णय घेण्यात आला आहे. येथे प्रवेश देण्यापूर्वीही हात सॅनिटाइझ करायला लावले जातात. शरीराचे तापमान मोजले जाते. त्यानंतर प्रवेश दिला जातो. मात्र, यापुढे येताना काही काम असेल, तर शक्यतो संबंधितांना फोन करा. त्यांनी बोलावले असेल, तरच या. त्यासाठी अगोदर रितसर लेखी परवानगी घ्या. ही परवानगी मिळाली, तरच प्रवेश दिला जाईल, असेही कळवण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांनी दोन लसी घेतल्या आहेत, त्यानांच या ठिकाणी प्रवेश देणार असल्याचे कळवण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे अजूनही लसीकरण झाले नाही, त्यांनी लस घ्यावी. कारण असे निर्णय, नियम साऱ्याच ठिकाणी होणार आहेत.
शहरातही नियम कडक
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाशिक शहरातही नियम कडक करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी शहरात कलम 144 लागू केले. त्यानुसार दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी असेल. तसेच किल्ले, प्राणीसंग्रहालये, उद्यानेदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. याव्यतिरिक्त खासगी कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीस मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी कामाचे विभाजन 24 तासात करण्याचे नाशिक प्रशासनाने सांगितले. खासगी कार्यालये 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिम आणि ब्युटी सलून 50 टक्के उपस्थितीनुसार सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच आता खुल्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.