नाशिकः गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अस्थींचे गुरुवारी नाशिमध्ये (Nashik) गोदातीरावरील रामकुंडात विसर्जन करण्यात आले. यावेळी मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होते. आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी वयाच्या 93 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र त्यांची तब्येत शनिवारी अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गोदाकाठावर गर्दी
लता दीदींच्या अस्थी विसर्जनासाठी समस्त मंगेशकर परिवार उपस्थित होता. आदिनाथ मंगेशकर यांनी अस्थींचे विसर्जन केले. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. त्यांनी यावेळी कपालेश्वर मंदिराचेही दर्शन घेतले. लतादीदी यांच्या अस्थी विसर्जनासाठी नाशिकमध्ये आल्या आहेत, हे समजताच अनेक रसिकांनी गोदाकाठावर गर्दी केली होती. यावेळी विधिवत अस्थींचे विसर्जन करण्यात आले. लतादीदींनी निरोप घेतला. आता अस्थीही गेल्या. त्यामुळे यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.
शब्दांच्या पलीकडे व्यथित
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या लतादीदी आम्हाला सोडून गेल्या. त्या सोडून गेल्याने एक पोकळी निर्माण झालीय, जी कधीही भरून येणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतल्या एक दिग्गज म्हणून स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधूर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लतादीदींच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तशीच काहीशी परिस्थिती आज अस्थी विसर्जनाला असणाऱ्यांची झाली होती.
सूर कायम राहतील…
लतादीदींनी या जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांची अनवट गाणी आपली साथ नेहमीच करतील. आपल्या सुखात असो की, दुःखात. त्यांचा स्वर आपल्याला जगण्याचे एक बळ देईल. तर कधी हक्काचा विसावा होईल. लतादीदींनी भले हे जग सोडले असेल, मात्र त्या स्वराच्या रूपाने कायम आपल्या जवळ राहतील, अशीच भावना येथे आलेल्या प्रत्येक रसिकाना मनाशी बाळगली. अनेकांनी ती बोलूनही दाखवली.