नवी मुंबईतील दक्षिण भागात सर्वाधिक प्रदूषण:दोषी कारखान्यांवर कारवाई
दक्षिण नवी मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाची चौकशी राज्य प्रदूषण मंडळ करणार असून रात्रीच्या वेळी मंडळाचे दक्षता पथक पाहणी करणार आहे. कळंबोली येथील नागरिकाने केलेल्या प्रदूषणाच्या तक्रारीनंतर मंडळाने हे आश्वासन दिले असून दोषी कारखान्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. तळोजा एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणामुळे चार कारखान्यांना टाळेबंदीची, तर तीन कारखान्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. खारघरमधील सहा दगडखाणींनादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसा दिलेल्या आहेत.
राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरपेक्षा नवी मुंबईतील दक्षिण भागात सर्वाधिक प्रदूषण असल्याचे स्पष्ट झाले आहे. तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्यांचा या प्रदूषणात जास्त हातभार लागत असून खारघर, तळोजा, कळंबोली, पनवेल, पडघे, रोडपाली, वांवजे या भागांत रात्रीच्या वेळी श्वास घेण्यासही त्रास होत आहे. येथील वाढत्या प्रदूषणाची तक्रार खारघर येथील वातावरण संस्थेने एका अहवालानुसार केली असून त्याचे गांभीर्य पनवेल पालिका अथवा सिडकोने घेतलेले नाही. त्यामुळे या संस्थेने बिलीबोर्डद्वारे कृत्रिम फुप्फुसे उत्सव चौकात काही दिवस ठेवली होती. येथील प्रदूषणाची मात्रा जास्त असल्याने ही फुप्फुसे दहा दिवसांत काळी पडल्याचे आढळून आले. वाढत्या प्रदूषणामुळे येथील नागरिक त्रस्त असून ते समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत. सिडकोचा सर्वाधिक पसंतीदायक नोड असलेल्या खारघरमध्ये अनेक मोठे प्रकल्प असून कॉर्पोरेटसारखा मोठा प्रकल्प येत आहे. याच खारघरमध्ये सकाळी प्रभातफेरीला जाणे त्रासदायक झाले असून १७ तास येथील नागरिक प्रदूषणकारी हवेत श्वास घेत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे कळंबोली येथील नागरिक श्रीधर शिरोडकर यांनी प्रदूषण मंडळाला याची गंभीर तक्रार केली असून मंडळाने त्याची दखल घेतली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे आजूबाजूच्या सर्व नागरिकांना त्रास होत असल्याने हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र सुरू केले जाणार आहेत. तळोजा एमआयडीसीतील तीन कारखान्यांना प्रदूषणाच्या कारणास्तव नोटिसा देण्यात आल्या असून खारघरमधील दगडखाणींनाही समज देण्यात आली आहे. मंडळाचे तळोजा प्रादेशिक अधिकारी किशोर कार्लीकर व रायगड विभाग एकचे अधिकारी सचिन अडकर यांनी दोषी कारखान्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.दक्षिण नवी मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या अनेक तक्रारी स्थानिक पातळीवर करण्यात आल्या. मात्र त्याची दखल घेण्यात येत नसल्याने पर्यावरणमंत्री अदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या या पर्यावरण विभागाने या तक्रारीची साधी दखल घेतली नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दक्षिण नवी मुंबईतील प्रदूषणाची अहवालासह तक्रार करण्यात आली आहे. ‘वातावरण’ने केलेल्या या तक्रारीकडे आता खारघरवासीयांची नजर लागून राहिली आहे.