नवनगर शहर विकसित करण्याची प्रक्रिया सुरू; विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना सूचना करण्याचे आवाहन
पालघर: पालघर जिल्हा मुख्यालय संकुलाची उभारणी करणाऱ्या सिडकोकडून उर्वरित ३७७ हेक्टर क्षेत्रात पालघरलगत नवे शहर विकसित करण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवनगर या नावाने उभारल्या जाणाऱ्या या शहर प्रकल्पाकरिता प्रभावी विकास धोरण आखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर विचारविनिमय सुरू असून गुंतवणूकदार व इच्छुक खरेदीदारांनी याबाबत उत्सुकता दाखवली आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.
राज्य शासनातर्फे ४४० हेक्टर क्षेत्रात पालघर जिल्हा मुख्यालय आणि पालघर नवीन शहर प्रकल्प विकसित करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. नवी मुंबईसारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर विकसित केलेल्या सिडकोकडून मुंबईपासून ११० किलोमीटर उत्तरेकडे व पालघर आणि बोईसर शहरांच्या मधोमध, ३७७ हेक्टर क्षेत्रावर पालघर नवनगर हे नवे शहर प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पातील १०३ हेक्टर क्षेत्र हे जिल्हा मुख्यालयासाठी तर ३३७ हेक्टर क्षेत्र हे नवीन शहरासाठी राखीव आहे. पालघर जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले असून यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद कार्यालय तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, नवीन प्रशासकीय इमारती, प्रेक्षागृह, शासकीय विश्रामगृह, जिल्हा मुख्यालयात किमान १० टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत. आतापर्यंत सिडकोकडून जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. सिडकोकडून उर्वरित ३७७ हेक्टरवर पालघरलगत नवे शहर विकसित करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली आहे. प्रस्तावित प्रकल्पाबाबत उद्योग जगताला माहिती देणे, त्यांच्याशी विचारविनिमय करणे. यामध्ये जमीन वापरास प्राधान्य, भाडेपट्टय़ाच्या अटी आणि विकास व विक्रयेता आदींबाबत उद्योजकांच्या सूचना जाणून घेण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. प्रभावी विकास धोरण आखण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ यांबरोबर मोलाचा विचारविनिमय करण्याकरिता स्वारस्य अभिव्यक्ती (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नव्या शहरामुळे अर्थव्यवस्थेला चालना
नवे शहर हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय- देशांतर्गत विमानतळापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. डहाणू रोड, पालघर आणि पनवेल दरम्यान असणारी मेमू रेल्वे सेवा पालघर ते नवी मुंबई दरम्यानची संधानता (कनेक्टिव्हिटी) वाढवण्यासाठी उपयोगात आणण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे. डहाणूतील वाढवण बंदर प्रकल्प नवीन शहरापासून तासाभराच्या अंतरावर आहे. या प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेस चालना मिळणे अपेक्षित आहे. पष्टिद्धr(१५५)म रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाव्यतिरिक्त वाढवण बंदर, प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरशी असलेल्या समीपतेमुळे शहर प्रकल्प सामाजिक -वाणिज्यिक विकास तसेच इच्छुक गुंतवणूकदारांना मोक्याच्या ठिकाणी गुंतवणूकीची संधी मिळेल ,अशी अपेक्षा आहे.
सिडकोकडून पालघर नवीन शहर प्रकल्प विकसित करण्यास सुरुवात करण्यात आली असून प्रकल्प विकसित करण्यापूर्वी बाजाराच्या पैलूंचे सखोल आकलन करून घेण्याचा सिडकोचा उद्देश आहे. तसेच, आर्थिकदृष्टय़ा वर्धनक्षम आणि विकासाच्या दृष्टीने शाश्वत ठरणारे नियोजन धोरण आखण्याबाबत, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येणाऱ्या मोलाच्या सूचनाही जाणून घेण्यात येतील.
-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको