‘ओएनजीसी’ दुर्घटनेतून बचावलेल्या व्यवस्थापकाचा थरारक अनुभव
नवी मुंबई : १७ मेच्या पहाटे अचानक वाढलेला वादळाचा वेग, पाच मीटर उंच उडत असलेल्या लाटा..खवळलेल्या समुद्रात नांगर निकामी झाल्याने बुडू लागलेला तराफा आणि त्यावरून पाण्यात उडय़ा मारत जीव वाचवण्यासाठी झगडणारे खलाशी.. ५०हून अधिक खलाशांचे बळी घेणाऱ्या ‘ओएनजीसी’ दुर्घटनेतून बचावलेल्या अनिल वायचाळ यांच्या तोंडून त्या घटनेचे वर्णन ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. तौक्ते वादळाच्या तडाख्यामुळे समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ या तराफ्यावर असलेल्या अनिल यांनी दहा तास पाण्यात हेलकावे घेत तग धरला आणि मृत्यूला हुलकावणी दिली. आपले किती सहकारी वाचले, किती अपयशी ठरले हे जाणून घेण्याचीही भीती वाटत असल्याचे ते सांगतात.
मूळचे साताऱ्याचे असलेले अनिल वायचाळ हे नवी मुंबईतील घणसोली येथे पत्नी व दोन मुलांसह राहतात. ओएनजीसीच्या तेलक्षेत्रात कार्यरत असलेल्या अॅफकॉन्स कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात वरिष्ठ व्यवस्थापकीय अभियंता असलेले अनिल हे तौक्ते वादळाने तडाखा दिला तेव्हा ‘पी ३०५’ या तराफ्यावर होते. ‘१६ मेच्या रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर नियमित कामे उरकली गेली आणि त्यानंतर डेकवर फेरफटकाही मारला. तोपर्यंत वादळाचा फार प्रभाव नव्हता. मात्र, १७ मेच्या पहाटे दोनच्या सुमारास अचानक वादळ सुरू झाले. त्यावेळी समुद्रातून पाच मीटर उंच लाटा तराफ्यावर धडका देत होत्या. वाऱ्याचा वेगही प्रचंड वाढला होता. त्याचवेळी तराफ्याचे आठपैकी पाच नांगर निकामी झाल्याचे दिसून आले. जीव मुठीत घेऊन अंधारात मदतीची प्रतीक्षा करत राहिलो. पण सकाळी साडेआठच्या सुमारास उरलेल्या तीनपैकी एक नांगरही निकामी झाला आणि तराफा खाली पाण्यात जाऊ लागला. बार्ज अध्र्याहून अधिक पाण्यात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही पाण्या उडय़ा घेतल्या. त्यावेळी नौदलाशी संपर्कही साधला. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना आमच्यापर्यंत तातडीने पोहोचणे शक्य नव्हते,’ असे अनिल यांनी सांगितले.
‘सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सर्वानी पाण्यात उडय़ा घेतल्या. सुरुवातीला आम्ही एकमेकांना घट्ट धरून लाटांवर तरून जाण्याचा प्रयत्न करत होतो. पण मोठी लाट आली की आमची ताटातूट होत होती. लाटांच्या तडाख्यामुळे आम्ही सर्वजण वेगवेगळय़ा दिशांना विखुरले गेलो,’ असे अनिल सांगत होते. ‘अंगावर लाइफ जॅकेट असल्यामुळे पाण्यावर तरंगता येत होते. मात्र, लाटेच्या तडाख्यामुळे शरीर पूर्णपणे उलटेसुलटे होऊन मागे ढकलले जात होते. त्यामुळे प्रचंड शारीरिक थकवा आला होता आणि पोटात अन्न नसल्याने शुद्ध हरपण्याची भीती वाटत होती. काही खलाशांनी लाइफ जॅकेट व्यवस्थित न बांधल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. काही तासांनी त्यांचे पाण्यावर तरंगणारे मृतदेह पाहून जिवाचा थरकाप उडत होता. दहा तास याच अवस्थेत काढल्यानंतर १८ मेच्या पहाटे दोनच्या सुमारास नौदलाची बोट दिसली आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला,’ हे सांगताना अनिल यांचे डोळे पाणावले होते. पाण्यात चहूबाजूला दिसणारे दृश्य आठवून आजही अंगावर काटा उभा राहतो, असे ते सांगतात. या घटनेची धास्तीच इतकी वाटते की, अजूनही सहकाऱ्यांपैकी कोण कोण जिवंत आहे, हे जाणून घेण्याची हिंमत झाली नसल्याचे ते सांगतात.
कुटुंबीयांची घालमेल
वादळाच्या तडाख्यात सापडल्यानंतर अनिल यांनी आपल्या पत्नीला मोबाइलवरून संदेश पाठवून कळवले होते. तेव्हाच त्यांच्या पत्नी, प्रगती यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली. नवी मुंबईतील त्यांच्या सर्व नातेवाइकांनी विविध मार्गाने संपर्क करून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेमकी माहिती समजत नव्हती. अशा अवस्थेत प्रगती यांनी कशीबशी रात्र ढकलली. १९ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता नौदलाच्या बोटीवर वाचवण्यात आलेल्या खलाशांना कुटुंबीयांना कळवण्यासाठी मोबाइल देण्यात आला, तेव्हा अनिल यांनी पत्नी प्रगती यांना आपण सुखरूप असल्याचे कळवले. पतीचा आवाज ऐकल्यानंतर काही वेळ पूर्णपणे सुन्न झाले होते, अशी प्रतिक्रिया प्रगती यांनी दिली.