मोरबे धरणासह जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभाच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक दिवसाचा ‘शटडाऊन’
नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी पाण्याच्या दृष्टीने वरदान ठरलेल्या खालापूर येथील मोरबे धरणाची शनिवारी अभियंता विभागाने पाहणी करून अनेक डागडुजीच्या कामांचा आढावा घेतला. या धरणावर छोटी-मोठी ७२ कामे केली जाणार असून त्यासाठी २५ मे रोजी एक दिवसासाठी पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. या महत्त्वाच्या कामात मंगळवारी धरणाच्या लोखंडी दरवाजांची डागडुजी, रंगरंगोटी आणि रेडीयल प्रवेशद्वाराची दुरुस्ती ही महत्त्वाची कामे केली जाणार आहे.
मोरबे धरणाच्या या डागडुजीबरोबरच शहरातील १११ प्रभागांतील पाणीपुरवठा करणारी यंत्रणेची देखील देखभाल दुरुस्ती केली जाणार असून उच्चस्तरीय व भूमिगत जलकुंभाची पाहणी केली जाणार आहे. मोरबे धरणात यंदा ७६ मीटपर्यंत पाणीसाठा असून हा साठा मुबलक पाऊस पडला नाही तरी सप्टेंबपर्यंत नागरिकांना पाणीपुरवठा केला जाऊ शकतो एवढा आहे. धरण भरण्यास केवळ १२ मीटर पाण्याची आवश्यकता असल्याने यंदा जुलै महिन्याअखेर धरण भरण्याची शक्यता असून पाण्याचा विर्सग मोठय़ा प्रमाणात करण्याची वेळ येणार आहे.
खालापूर तालुक्यातील धावरी नदीवर मोरबे धरणाची उभारणी झाली आहे. जलसंपदा विभागाच्या मालकीचे हे धरण नवी मुंबई पालिकेने २५ वर्षांपूर्वी विकत घेतले आहे. त्यामुळे पंधरा लाख लोकसंख्येच्या नवी मुंबईला पाणीपुरवठय़ाबाबत अपवाद वगळता अडचण येत नाही. यंदा पावसाळा सात ते दहा जून दरम्यान सुरू होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सून पूर्वे कामे पालिकेने वेगाने उरकण्यास सुरुवात केली आहे. शहराला २४ तास अव्याहत पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाहणी अभियंता विभागाने शनिवारी कसून केली. शहर अभियंता संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य, विद्युत, तांत्रिक, अभियंत्यानी मोरबे धरणाची मान्सून पूर्वे कामांची यादी तयार केली असून यातील काही महत्त्वाची कामे ही मंगळवारी एकाच दिवशी उरकली जाणार आहेत. त्यासाठी अभियंता, अधिकारी, मजूर, कामगार यांच्या तीस ते चाळीस जणांची एक तुकडी हे काम करणार असून त्यासाठी सोमवारी सर्व यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
मोरबे धरणाच्या दुरुस्तीबरोबरच भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्र व शहरातील साठपेक्षा जलकुंभाची गळती, दुरुस्ती, कामे केली जाणार असून सर्व देखभाल कंत्राटदार व अभियंता यांना तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
यंदा धरण लवकर भरणार
खालापूर तालुक्यातील धावरी या पावसाळी नदीवर उभारण्यात आलेल्या या धरणात ३८.३९ क्युबिक मीटर पाणीसाठय़ाची क्षमता असून दररोज ४५० दशलक्ष लिटर पाणी उपसा केला जात आहे. धरण पूर्ण भरण्यासाठी ८८ मीटर उंच पाणी भरावे लागते. सध्या ७६ मीटर शिल्लक असून केवळ १२ मीटर पाणी भरले की धरण वाहणार आहे. त्यासाठी ३३ मिमी पाणी लागणार असून माथेरानचा परिसर असलेल्या या धरण क्षेत्रात पाऊस जोरदार पडत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे यंदा धरण लवकर भरणार आहे.
शहराला दररोज साडेचारशे दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची डागडुजी हा वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. मात्र मान्सूनपूर्व काही कामे महत्त्वाची असून ती एकाच दिवसात कशी पूर्ण होतील यासाठी २५ मे रोजी ‘शटडाऊन’ घेण्यात आले आहे. यात विर्सग केला जाणाऱ्या लोखंडी दरवाजांची साफसफाई व दुरुस्ती महत्त्वाची आहे. यंदा पाऊस समाधानकारक पडल्यास धरण पहिल्या दोन महिन्यांतच भरण्याची शक्यता आहे.
मनोहर सोनवणे, कार्यकारी अभियंता, महापालिका