पर्याय निर्माण करण्यात पनवेल पालिकेला अपयश
पनवेल : करोनामुळे गेल्या वर्षीपासून सर्वच शाळा बंद असल्याने ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मात्र पनवेल पालिकेच्या शाळांमध्ये तेही बंद आहे. त्यामुळे दहा शाळांमधील १९२० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अडचणीत आले आहे. पनवेल पालिकेला ऐवढ्या कालावधीनंतरही ऑनलाइन शिक्षणासाठी सक्षम पर्याय निर्माण करता आला नसल्याने पालिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शिक्षकांना मात्र करोनाबाधितांच्या शोधासाठी जुंपले आहे. पालिका शाळांतील ७४ शिक्षक हे आरोग्य कर्मचारी झाले असून ते करोनाग्रस्तांसोबत संवाद साधण्याचे काम करत आहेत. राज्य सरकारने गृह विलगीकरण कक्ष बंद करण्याच्या सूचना दिल्या असून ते काम हे शिक्षक करीत आहेत.
पनवेल पालिकेच्या स्थापनेला ऑक्टोबर महिन्यात पाच वर्षे पूर्ण होतील. पालिकेच्या १० शाळांमधील ७४ शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला सव्वा सहा कोटी रुपये पालिका खर्च करते. मात्र सध्या पालिकेचे वेतन घेणारे शिक्षक गेली १४ महिने अद्यापनाचे काम विसरून गेले आहेत. आरोग्य विभागाचे काम शिक्षक दीड वर्षांपासून करत आहेत.
पनवेल पालिकेच्या १०शाळांमध्ये पहिली ते सातवीचे शिक्षण दिले जात होते. गेल्या वर्षी सातवीतील सर्वच विद्यार्थी पुढील आठवी इयत्तेत गेल्याने १६५० विद्यार्थी आजही या शाळांचे विद्यार्थी आहेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी या शाळा महत्त्वाच्या आहेत. मात्र विद्यर्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी स्मार्टफोन नसल्याने शिक्षक व विद्यार्थी यांमधील संवाद खुंटला आहे. स्मार्ट फोन किंवा एका टॅबची किंमत आठ हजार रुपये आहे, असे शेकडो टॅब या विद्यार्थ्यांना हवे असल्याने पालिकेच्या शिक्षण विभागाने पनवेलमधील ४५ विविध खासगी कंपन्यांच्या व्यवस्थापनाला मदतीचा हात मागितला. मात्र एका कंपनीने पालिकेला फक्त सहा टॅब दिले. सध्या शिक्षकच शाळेत नसल्याने हे टॅबही शिक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. दीड वर्षांपासून शिक्षकच अभ्यासापासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यापूर्वी शिक्षकांची पूर्वतयारी करून घेण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे.
पोषण आहार मात्र दिला
पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पाच किलो ६०० ग्रॅम तांदूळ तसेच १ किलो १२० ग्रॅम तूरडाळ आणि सहावी ते आठवी या इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी ८ किलोग्रॅम तांदूळ व एक किलो ६८० ग्रॅम हरभरा डाळ दिली जाते. विशेष म्हणजे ऑनलाइन शिक्षण बंद असले तरी जानेवारी महिन्यापर्यंतचे शालेय शिक्षण पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पालकांनी घेतला असल्याची नोंद शिक्षण विभागाच्या दफ्तरी नोंदविली आहे. पोषण आहार शाळेत आल्याचे कळविल्यानंतर हे धान्य पालकांपर्यंत दिले जाते, अशी व्यवस्था शिक्षण विभागात आहे.
आराखडा नाही
पनवेल पालिकेच्या शिक्षण विभागाने पहिली ती सातवी इयत्तेत किती विद्यार्थी शिकतात, पालिकेच्या शाळांकडे हे विद्यार्थी आकर्षित होण्यासाठी शैक्षणिक विकास आराखडा आखावा असे कोणतेही प्रयत्न पालिकेने केलेले नाहीत. रस्ते, गटार व इमारती बांधण्यापलीकडे पालिकेने काय केले असा प्रश्न आता पनवेलकर विचारत आहेत. सध्याही पालिकेच्या १० शाळांमध्ये शिकणारे किती विद्यार्थी पनवेलमध्ये उपलब्ध आहेत, असा कोणताही सर्वे पालिकेने केलेला नाही.
पनवेल पालिका शिक्षणाबाबत गंभीर आहे. करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर शिक्षकांना त्यांच्या मूळ पदावर काम करण्याचे आदेश दिले जातील. पालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल. पनवेलमधील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांनी पालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घ्यावे याच अनुषंगाने पालिकेचे शिक्षण धोरण आखले आहे. – सचिन पवार, उपायुक्त, पनवेल पालिका