नवी मुंबई : करोनाची दुसरी लाट ओसरल्याने गेली दोन दिवस शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. मात्र बुधवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले. शहरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत १३७.६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून अनेक ठिकाणी सखल भागांत व भुयारी मार्गात पाणी साचले होते. मात्र महापालिका प्रशासनाने फक्त दोनच ठिकाणी पाणी साचण्याचा दावा केला आहे. पावसामुळे हार्बर व ट्रान्सहार्बर रेल्वेसेवाही विस्कळीत झाली होती.
हवामान विभागाने पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने पालिका प्रशासनानेही शहरात अतिदक्षतेचा आदेश जारी केला असून गुरुवारी लसीकरणही बंद ठेवण्यात येणार आहे.
शहरात काही भागांत पाणी साचण्याच्या घटना घडल्या. रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गात पाणी साचले होते. महापालिकेने शहरात ९ ठिकाणी साठलेले पाणी उपसा करण्यासाठी पंपाची व्यवस्था तसेच धारण तलावातील पाणी शहरात येऊ नये यासाठी मोठय़ा पंपांचीही व्यवस्था केली होती. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी साचले नाही. तसेच
दरवर्षी पावसाळ्यात शीव- पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात पाणी साठण्याच्या घटना घडत असतात. यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याऐवजी महापालिकेने महामार्गाशेजारील नाल्यांची सफाई केली आहे. त्यामुळे महामार्गावरही पाणी तुंबले नसल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
शहरात काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनाही घडल्या आहेत. शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. सायंकाळी ५ नंतर पावसाचा जोर काहीसा मंदावला होता. रविवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्येच जोरदार पावसामुळे खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व व्यवस्था सज्ज करण्यात आली होती. तसेच शहरातील पावसाळापूर्व सर्व कामे पूर्ण करण्यात आली असल्याने शहरात पाणी साचण्याच्या मोठय़ा घटना समोर आल्या नाहीत.
आवश्यक त्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्यात आली होती, त्यामुळे तत्काळ पाणी उपसा करण्यात आला. शनिवापर्यंत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महापालिका प्रशासन मात्र सज्ज आहे, असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
शहरात बुधवारी मध्यरात्रीपासूनच संततधार सुरू झाली. सकाळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मुंबईत कुर्ला व सायन परिसरात रुळांवर पाणी साचल्याने सकाळपासूनच रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. सकाळी १०.२० मिनिटांपासून रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे पनवेल-सीएसएमटी तसेच पनवेल बांद्रा, गोरेगाव रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले तर काही जणांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले. दरम्यान वाशी ते मानखुर्द विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यात येत होत्या. ट्रान्स हार्बरमार्गावरील पनवेल-ठाणे, वाशी-ठाणे रेल्वेसेवाही धिम्या गतीने सुरू होती.
पनवेल तुंबले
मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून रस्त्यांवरही सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. नवीन पनवेल वसाहतीमधील बांठिया हायस्कूलसमोरील मार्ग पाण्याखाली गेला होता. तर शहरातील पंचरत्न हॉटेल ते भाजप कार्यालयापर्यंतचा रस्ता, शीव-पनवेल महामार्गावर अमरधाम तसेच कळंबोली येथील बसथांब्यावर एक ते दीड फूट पाणी तुंबले होते.