नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून मोठा वाद उभा राहिला आहे. विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी होत असून, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. नवी मुंबईसह पनवेल, कल्याण, ठाणे, रायगड भागातील नागरिक आंदोलनाचा पावित्र्यात आहेत, तर दुसरीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यावर शिवसेना ठाम आहे. दरम्यान, विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं जाणार असल्याचं शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी नवी मुंबईतील विमानतळाला नाव देण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येईल. तर भविष्यातील दुसऱ्या मोठ्या प्रकल्पाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचं नाव दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संघर्ष समितीला दिले आहे,’ अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.
जाणून घ्या : दि. बा. पाटील कोण होते? नवी मुंबई विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी का केली जातेय?
‘पूर्वी जर कोणाचे नाव दिले असते, आणि ते नाव काढून आम्ही शिवसेनाप्रमुखांचे नाव सुचवले असते, तर ते योग्य नव्हते. आम्ही दि. बा. पाटील यांचा आदर करतो. दि. बा. पाटील कृती समितीने दुसऱ्या प्रकल्पासाठी नाव सुचवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे,’ अशी माहिती शिंदे यांनी दिली. ‘यासंदर्भात कृती समितीसोबत एक बैठक झाली आहे. आणखी एक बैठक होणार आहे. त्यातून सकारात्मक निर्णय होईल,’ असा विश्वासही यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
प्रकल्पग्रस्तांची मानवी साखळी; दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी
नवी मुंबईतील प्रस्तावित विमानतळाला दिवंगत खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. या मागणीसाठी नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, रायगडमधील भूमिपुत्रांनी आंदोलन उभारले आहे. आज मुंबईसह इतर भागात मानवी साखळी तयार करण्यात आली होती. राज्यातील विविध संघटना व काही राजकीय पक्षांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.