नवी मुंबई : महापेगाव पेट्रोल पंपासमोर उच्च दाबाच्या वीजवाहिनीखाली वाहनांचे बेकायदा देखभाल केंद्र असून या केंद्रावर ज्वलनशील पदार्थाची वाहतूक करणारे टँकरही दुरुस्तीसाठी येत आहेत. या सर्व प्रकारामुळे दुर्घटना होऊ शकते. याबाबत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर महावितरण अधिकाऱ्यांनी जागा आमच्या मालकीची नसून जर आमच्या वीजवाहिन्यांना धक्का लागला तरच आम्ही कारवाई करू शकतो असे सांगितले.
महापे गावातील पेट्रोल पंपासमोर उच्च दाबाच्या वीजवाहिनी खाली आणखी हे देखभाल केंद्र आहे. अशा ठिकाणी रहिवासी तसेच व्यावसायिक वापर करता येत नाही. मात्र नियम न पाळता हे केंद्र सुरू असून दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टँकरमधील ज्वलनशील रसायनाने पेट घेतला तर वीजवाहिन्यांमध्ये स्फोट होऊ शकतो. तसेच लगतचे पेट्रोल पंप तसेच महापे वीज उपकेंद्राला धोका निर्माण होऊ शकतो.
महापे गाव येथील उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांखाली वाहनांचे देखभाल केंद्र सुरू असले तरी त्याच्यावर कारवाई करण्याचे महावितरणाच्या अखत्यारीत नाही. परंतु वीजवाहिन्यांना धक्का लावला तर महावितरण कारवाई करू शकते, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता क्षमकांत बोरसे यांनी सांगितले.