नवी मुंबई : शैक्षणिक शुल्क तात्काळ न भरल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात बसू दिले जात नसल्याची शाळांची मनमानी सुरू आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी चार शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र तसेच एका शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस मुंबई शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे.
न्यू होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली तेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूल, कोपरखैरणे, सेंट लॉरेन्स स्कूल, वाशी, रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा, अमृता विद्यालय, नेरुळ या ५ शाळांच्या तक्रारी नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये याबाबत सूचित करण्यात आलेले होते. तरीही शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना या शाळा ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवत होत्या. शासनाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे कारवाई करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक यांच्याकडे केली आहे.