नवी मुंबई : सिडकोच्या उलवे नोडजवळ असलेल्या न्हावा बेटाचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी सिडकोने गुंतवणूकदारांचे स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव मागितले आहेत. ठाणे खाडीच्या उत्तर बाजूस असलेले हे बेट तिन्ही बाजूने अरबी समुद्राच्या पाण्याने वेढले असून समोर ऐतिहासासिक एलिफंटा लेणीचे विलोभनीय दृश्य आहे. नवी मुंबई पालिकेने विकास आराखडय़ात या बेटावरील तीस हेक्टर जागेवर प्रादेशिक उद्यान प्रकल्पाचे आरक्षण टाकले आहे. या बेटाचा विकास झाल्यास नवी मुंबईला एक नैर्सगिक पर्यटन स्थळ मिळणार आहे.
उलवे नोडपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे साठ हेक्टर क्षेत्रफळाचे बेट प्रस्तावित न्हावाशेवा शिवडी सागरी सेतूपासून जवळ आहे. त्यामुळे सिडकोने या बेटाचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती प्रस्ताव निविदा प्रसिद्ध केली आहे. या बेटावर विकास व पर्यटनस्थळ निर्माण करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदार व खरेदीदारांसाठी सिडकोने सर्व माहिती आपल्या संकेतस्थळावर २७ जूनपासून दिली आहे. या प्रकल्पासाठी देकार देण्याची मुदत २९ जुलैपर्यंत आहे. या स्वारस्य प्रस्तावाद्वारे मिळालेल्या सूचना या निविदापूर्व अर्हतेसाठी केला जाणार नाही, असे सिडकोने स्पष्ट केले आहे. या प्रस्तावाद्वारे मिळालेल्या सूचना व अभिप्रायांचा समावेश विनंती प्रस्तावात करण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार सिडकोने राखून ठेवले आहेत.
शहराच्या सौंदर्यात भर
गेली अनेक वर्षे अडगळीत पडलेले हे बेट विकसित करण्याचा सिडकोने प्रयत्न केला आहे. त्यामुळे पर्यटनाबरोबरच विविध प्रकारच्या सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासांठी या बेटाचा उपयोग होऊ शकणार आहे. सिडकोच्या या प्रस्तावावर अनेक गुंतवणूकदारांच्या उडय़ा पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिडकोने खारघर हिल प्लॅटय़ू या पारसिक डोंगराच्या रांगेत असलेल्या २५० एकर जागेची निविदा काढली होती. हॉलिवूडच्या धर्तीवर या ठिकाणी चंदेरी दुनिया निर्माण करण्यासाठी एक हजार ५०० कोटीचा देकार या प्रकल्पाला आला होता. पण विमानतळ परिसर उंची मर्यादेची अडचण समोर आल्याने ही निविदा मागे पडली आहे. मात्र त्यासाठी सिडकोने उंचीमर्यादा कमी करुन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन प्रकल्पांमुळे नवी मुंबईच्या शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.