उरण : पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने भाताची रोपे करपू लागली असून उरणमधील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारीही सुरू केली आहे.
जून महिन्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे उरणमधील शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नव्हती. ज्या शेतकऱ्यांची शेती उंच ठिकाणी आहे अशा शेतकऱ्यांनी काही प्रमाणात पेरणी केली होती. मात्र त्या वेळी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी रोपे उगवली नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर आलेल्या पावसाच्या सरींमुळे काही प्रमाणात रोपे उगवली. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. त्यामुळे येथील शेतकरीही शेतीच्या मशागतीला लागला होता. मात्र मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढला आहे. या उन्हामुळे भाताची रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे शेतीचे आलेले पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सुरुवातीला चांगला पाऊस झाला होता. मात्र पावसाने एकदम दडी मारल्याने रोपे करपू लागली आहेत. त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली, असे मत रवींद्र कासुकर या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे.