उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट या क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय सोमवारी पनवेल येथे झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. २४ जून रोजी झालेल्या बेलापूर येथील आंदोलनात १५ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला मुदत देण्यात आली. त्यानंतर विमानतळाचे काम बंद करण्याचाही इशारा दिला आहे.
समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. या आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी पनवेल येथील आगरी समाज सभागृहात समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे ९ ऑगस्ट या क्रांती दिनी दि.बांचे जन्मगाव असलेल्या जासईमध्ये मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामपंचायतींचे ठराव पाठविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील,माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर,आमदार महेश बालदी तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.