नवी मुंबई : मुंबई, ठाण्यानंतर नवी मुंबई पालिकेनेही चिपळूण व महाड तालुक्यांच्या मदतीसाठी वेगळे मदत केंद्र उभारले आहे. विविध प्रकारच्या मदतीबरोबरच १२ डॉक्टरांचे एक पथक चिपळूणला रवाना केले आहे. तर महाड येथे अनेक ठिकाणी साचलेला गाळ, चिखल आणि ढिगारे स्वच्छ करण्यासाठी पालिकेने नवी मुंबईतून दोन जेसीबी आणि चार ट्रक रवाना केले आहेत.
महाडमधील ढिगारे व गाळ स्वच्छ करण्यासाठी ४३ जणांचे एक साफसफाई कामगारांचे पथक ‘एनएमएमटी’च्या बससह रवाना करण्यात आले आहे. याशिवाय दोन जीप, छोटा ट्रक, पाण्याचे चार टँकर, सात हजार लिटर पिण्याचे पाणी, ब्लँकेट पाठविण्यात आले असून दोन जेसीबी ट्रकद्वारे रवाना करण्यात आले आहेत. याशिवाय दैनंदिन लागणाऱ्या अनेक वस्तू पालिकेच्या वतीने जमा करण्यात आल्या असून त्यांचे वितरण केले जात आहे. स्वच्छतेसाठी कोबरेलिक व ब्लिचिंग पावडरचा मोठा साठा पाठविण्यात आला आहे. याशिवाय पालिकेने सहा हजार सॅनिटरी पॅडदेखील रवाना केले आहेत. डॉ.प्रशांत अहेर, पंकज तितार, उज्ज्वल नाईक यांच्या मार्गदर्शनाखलीचिपळूणला रविवारी १२ डॉक्टरांचे पथक पाठविण्यात आले आहे.
पनवेल पालिकेचीही मदत
पनवेल : महाड शहराला पुन्हा उभारी देण्यासाठी पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. दोन जेसीबी आणि दोन पाण्याने भरलेले टँकर तसेच तीन टन कचरा उचलू शकणारे चार टिपरवाहने, दोन फॉगिंग मशिन्स तसेच फवारणीसाठी ५०० किलो जंतुनाशक रसायने, ५० स्वच्छता कर्मचारी आणि ५ पर्यवेक्षक यांचे विशेष पथक महाडला रवाना करण्यात आले आहे.