नवी मुंबई : मोठय़ा प्रतीक्षेनंतर गुरुवारी नवी मुंबई महापालिकेला लस उपलब्ध झाल्याने शुक्रवारी शहरांतील ९१ केंद्रांवर १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांना पहिल्या मात्रेचे लसीकरण करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र कोविन अॅपवर आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे नियोजन गडबडले. १५ हजार जणांना लस देण्याचे ठरविले होते, मात्र दिवसभरात ८,२९२ जणांनाच लस देता आली. शनिवारी ३३ केंद्रांवर दुसऱ्या मात्रेचे लसीकरण करण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहरात महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर ३ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे पहिल्या मात्रेचे लसीकरण बंद होते, तर ४५ वर्षांवरील नागरिकांचेही पहिल्या मात्रेचे लसीकरण मागील महिनाभरापासून बंदच होते. लस तुटवडय़ामुळे शहरात फक्त दुसऱ्या मात्रेचे लसीकरण उपलब्धतेनुसार सुरू होते. गुरुवारी पालिकेला १७,५०० कोव्हिशिल्ड व ५००० कोव्हॅक्सिन लस मिळाल्याने शुक्रवारी महिनाभरानंतर प्रथमच ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिल्या मात्रेचे लसीकरण करण्यात येणार होते. यासाठी ९१ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर लस मिळणार असल्याने नागरिकांनी पहाटेपासूनच केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. सकाळी लसीकरणाला चांगला प्रतिसाद होता; परंतु दुपारी ११.३० नंतर अॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुपारी २.३० वाजेपर्यंत होता. त्यामुळे लसीकरणात खंड पडला. त्यामुळे अपेक्षेपेक्षा कमी लसीकरण झाल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेला शुक्रवारी शहरात पहिल्या मात्रेचे १५ हजार जणांचे लसीकरण
होण्याचा अंदाज होता; परंतु ८ हजारांच्या जवळपास लसीकरण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. शनिवारी पुन्हा फक्त दुसऱ्या मात्रेचेच ३३ केंद्रांवर लसीकरण होणार आहे.
नवी मुंबई शहरात शुक्रवारी महिनाभरानंतर ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पहिल्या मात्रेच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले होते; परंतु पोर्टलमध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे अपेक्षित लसीकरण झाले नाही. शनिवारी शहरातील ३३ केंद्रांवर कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिनच्या फक्त दुसऱ्या मात्रेचे लसीकरण होणार आहे.
-डॉ.रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, नवी मुंबई महानगरपालिका