पाणीवगळता सर्व विभागांचे सिडकोकडून लवकरच हस्तांतर

पनवेल महापालिका आयुक्तांचे सर्वसाधारण सभेत आश्वासन

पनवेल : सिडकोकडून अद्याप अनेक सेवांचे पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण न झाल्याने पालिका प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत. या महत्त्वाच्या विषयावर शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. नगरसेवकांनी असलेल्या त्रुटी पूर्ण करूनच हस्तांतरण करावे अशी आग्रही भूमिका मांडली. त्यानंतर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पाणी विभागवगळता सर्व सेवा सिडकोकडून लवकरच हस्तांतर करून घेणार असल्याची माहिती सभागृहात दिली.

कामोठे येथील नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या काळात सिडको वसाहतींमधील समस्यांचा पाढा वाचला. याची री ओढत खांदेश्वर वसाहतीमधील नगरसेवक एकनाथ गायकवाड, कळंबोलीतील नगरसेवक सतीश पाटील यांनी संबंधित वसाहतीचे प्रश्न मांडले. मलनिस्सारण वाहिनी, जलवाहिनी, सखल भागामुळे वसाहतींत निर्माण झालेले प्रश्न नगरसेवकांनी मांडले. हे सर्व प्रश्न सिडकोने सोडविल्याशिवाय सेवांचे हस्तांतर करणे पालिकेसाठी भुर्दंड ठरेल असे मत नगरसेवकांनी यावेळी मांडले. यावर महापालिका आयुक्त देशमुख यांनी पाणी विभागवगळता लवकरच वसाहतींचे हस्तांतर होणार असल्याचे सांगितले.

ऑफलाइन सभेची मागणी

ऑनलाइन सर्वसाधारण सभेत महापौरांच्या सूचना, त्यांचा आवाज नगरसेवकांना ऐकू येत नसल्याच्या अनेक तक्रारींमध्ये शुक्रवारी पालिकेची ऑनलाइन सभा झाली. त्यामुळे नगरसेवकांनी ५० टक्के उपस्थितीत ऑफलाइन सभा घेण्याची मागणी केली. शासनाच्या सूचनेनुसार निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनो सांगितले.

महिनाभरानंतरही उपमहापौरांना उत्तर नाही

उपमहापौरांनी गेल्या महिन्यातील सभेत विचारलेल्या प्रश्नांना महिना उटल्यानंतर उत्तर पालिका प्रशासनाने न दिल्याने शेकापच्या पालिका सदस्यांनी सभेत याकडे लक्ष वेधले. यावर महापौरांनी तुमचा प्रश्न विचारा, उपमहापौरांचा प्रश्न ते विचारतील असे बोलून गप्प केले.

Comments : 0


    No Comments

Leave a comment